तळीये गावाच्या पुर्नविकासासाठी देणार रायगड ट्रस्ट चार एकर जागा !


मुंबई – रायगड जिल्ह्यातील महाडमधील दुर्घटनाग्रस्त तळीये गावाच्या पुर्नविकासाचा मार्ग आता मोकळा झाला असून या गावच्या पुर्नविकासासाठी रायगड ट्रस्टच्यावतीने चार एकर जमीन दिली जाणार आहे. त्याचबरोबर म्हाडाने या संदर्भात तातडीच्या बैठकीचे देखील आयोजन केले आले असून, म्हाडाचे अधिकारी व मंत्री तळीये गावात जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आज राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांना छत्रपती संभाजीराजे यांनी या संदर्भात फोन केल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता तळीये गावाच्या पुनर्विकासासाठी रायगड ट्रस्टची चार एकर जागा देण्यात आली आहे. या अगोदरच म्हाडाने तळीये गावाच्या पुनर्विकासाची जबाबदारी घेतली असल्याची घोषणा जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे. त्यानंतर आता पुनर्विकासाच्या नियोजनासंदर्भात बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती एबीपी माझाने दिली आहे.

तळीये गावात झालेल्या दुर्घटनेत तब्बल ३२ घरे गाडली गेली. तर इतर घरांचेही नुकसान झाले. अवघे गावच उद्ध्वस्त झाले असून, हे गाव पुन्हा वसवण्याचे काम म्हाडाकडून केले जाणार आहे. गावात उभारण्यात येणाऱ्या घरांची रेखाचित्र ट्वीट करत आव्हाड यांनी याची माहिती दिलेली आहे.

आत्तापर्यंत तळीये दुर्घटनेत ५३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली होती. काल दिवसभरात ११ मृतदेह सापडले असले तरी ३१ जण मात्र ढिगाऱ्याखाली अडकल्याचे सांगितले जात होते. या अडकलेल्या नागरिकांना मृत घोषित करा आणि त्यांना बाहेर काढू नका अशी मागणी या गावातील नागरिक, मृतांचे नातेवाईक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी करत होते. त्यामुळे आता शोध आणि बचाव मोहीम थांबवत त्या ३१ बेपत्ता नागरिकांना मृत घोषित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.