सिद्धार्थ मल्होत्राच्या ‘शेरशाह’चा जबरदस्त ट्रेलर रिलीज


गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा त्याचा आगामी चित्रपट ‘शेरशाह’ मुळे बराच चर्चेत आहे. या चित्रपटाचा टीझर दोन आठवड्यापूर्वी रिलीज झाला होता. अ‍ॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर जागतिक पातळीवर हा चित्रपट रिलीज होणार आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाचा ट्रेलर सिद्धार्थने शेअर केला आहे.

कारगीलमध्ये पराक्रम केलेल्या कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका ‘शेरशाह’या चित्रपटात सिद्धार्थ साकारणार आहे. तसेच या चित्रपटात त्याची प्रेयसी डिंपल चीमा यांची भूमिका कियारा अडवाणी साकारताना दिसेल या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना विक्रम बत्रांच्या प्रेमकथेची झलक पाहायला मिळणार आहे. शौर्य, प्रेम आणि त्यागाची ही कथा १२ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


सिद्धार्थने या चित्रपटाचा ट्रेलर त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत कॅप्टन विक्रम बत्रा सेवेसाठी हजर आहे. फायनली ही प्रतीक्षा संपली, आमच्या कारगिल वॉर हिरोची कथा तुमच्यासमोर सादर करत आहोत आणि मला याचा अभिमान वाटत असल्याचे कॅप्शन त्याने दिले आहे. सध्या सोशल मीडियावर सिद्धार्थने शेअर केलेला हा ट्रेलर प्रचंड व्हायरल होत आहे.

१९९९ सालातील कारगिलच्या युद्धात त्यांनी दिलेल्या बलिदानाला ‘शेरशाह’या चित्रपटाद्वारे मानवंदना देण्यात येत आहे. कॅप्टन बत्रा यांनी आपले ‘शेरशाह’हे नाव सार्थ करत दिलेला साहसी लढा आणि सरतेशेवटी केलेले बलिदान भारताच्या विजयामध्ये महत्त्वाचे ठरले होते. या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीसोबत शिव पंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशू अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अंकिता गोराया, अनिल चरणजीत, साहिल वैद, शताफ फिगर आणि पवन चोप्रा देखील म्हातावची भूमिका सकरतान दिसतील.

विष्णू वर्धन दिग्दर्शित आणि धर्मा प्रोडक्शन्स व काश एंटरटेनेमेंट यांची संयुक्त निर्मिती असलेला ‘शेरशाह’ हा बॉलिवूडचा या वर्षातील सर्वात मोठ्या युद्ध कथेवर आधारित चित्रपट असणार आहे. हा चित्रपट भारता बरोबरच जगभरातील देशांमध्ये अ‍ॅमेझॉन प्राइमवर पाहता येणार आहे.