मुंबई महानगरपालिकेच्या पब्लिक स्कुलसाठी मोठा प्रतिसाद हे शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याचे द्योतक – आदित्य ठाकरे


मुंबई – मुंबई महानगरपालिकेच्या पब्लिक स्कुलमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांचा प्रतिसाद वाढणे हे शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याचेच द्योतक आहे, अशा पद्धतीच्या शाळा राज्यात सर्वत्र असाव्यात यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले. दिंडोशीमधील मुंबई महानगरपालिका पब्लिक स्कुलच्या नव्याने उभारलेल्या इमारतीचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सुनील प्रभू, भाई जगताप, मुंबईचे उपमहापौर सुहास वाडकर आदी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये काही नाविन्यपूर्ण करण्याच्या संकल्पनेतून मुंबई पब्लिक स्कूल आणि त्यात एसएससी सह सीबीएसई, आयसीएसई अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. याबरोबरच महापालिकेच्या शाळांमध्ये अद्ययावत मूलभूत सोयी सुविधाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. दर्जेदार शैक्षणिक अभ्यासक्रमांबरोबरच खेळ आणि इतर उपक्रमांवरही भर दिला जात आहे. याचाच भाग म्हणून फिफा, लॉर्डस्, अशा जागतिक दर्जाच्या संस्थांबरोबर करार केले जात आहेत. विद्यार्थ्यांना लहानपणापासून उपयुक्त सवयींचे प्रशिक्षण दिले जात असून त्यांची नियमित वैद्यकीय तपासणी, व्यावसायिक कारकीर्दीबाबत समुपदेशन करून सर्वांगीण विकास घडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत एक लाख दहा हजार विद्यार्थ्यांचे डेंटल चेकअप केल्याचेही त्यांनी सांगितले.

विविध माध्यमांतून सर्व अभ्यासक्रम मोफत शिकविणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील कदाचित पहिली महानगरपालिका असेल, असे सांगून ठाकरे यांनी विद्यार्थी संख्या वाढत असताना महानगरपालिकेने शिक्षणाचा दर्जा राखण्यात सातत्य ठेवावे, असे आवाहन केले.

यावेळी भाई जगताप यांनी सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळू शकते हा विश्वास निर्माण केल्याबद्दल आणि शिक्षणाचे नवे पर्व सुरू केल्याबद्दल महापालिकेचे आभार मानले. मंत्री आदित्य ठाकरे यांनी कामाच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पुनर्बांधणी नंतर उभारलेल्या या पाच मजली शाळेत विद्यार्थ्यांसाठी सर्व अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते मालाडच्या त्रिवेणी नगर येथे मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उभारलेल्या स्व. माँ. मीनाताई बाळासाहेब ठाकरे डायलिसीस केंद्राचे आज लोकार्पण केले. याठिकाणी १० डायलिसिस मशीन उपलब्ध असून पुढील काळात आणखी ६ मशीन्स उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.