अतिक्रमणे नियमानुकूल करून गरजूंना घरे मिळवून द्या – यशोमती ठाकूर


अमरावती : सर्वांसाठी घरे योजनेचा लाभ प्रत्येक गरजूला मिळवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी अतिक्रमणे नियमानुकूल करणे, नियोजित घरकुलांना चालना देण्याची कामे गतीने पूर्ण करावी, असे निर्देश पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.

नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत, रोहयो विकासकामे व विविध विषयांचा आढावा पालकमंत्र्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत घेतला. आमदार बळवंतराव वानखेडे, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी पवनीत कौर, सहायक जिल्हाधिकारी मंदार पत्की, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यात पंड्या, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, उपजिल्हाधिकारी राम लंके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत थोरात, शिक्षणाधिकारी एजाज खान, मुख्याधिकारी गीता वंजारी उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, नांदगाव खंडेश्वर येथे अग्निशमन दलासाठीचे वाहनासाठी निधी देण्यात आला आहे. मात्र, अद्याप वाहन उपलब्ध झाले नाही. प्रशासकीय कार्यवाही गतीने पूर्ण करून ते तत्काळ उपलब्ध करून घ्यावी. शहरात स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करावे. भाजी व फळ बाजारासाठी योग्य इमारत निर्मिती करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

‘मनरेगा’तून अधिकाधिक कामे राबवा
ग्रामीण स्तरावर मत्ता निर्माण करून शाश्वत विकास साधता यावा आणि गावातच रोजगार निर्मिती व्हावी यासाठी ‘मनरेगा’तून अधिकाधिक कामे राबविण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. मनरेगाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तालुकास्तरावर तालुका प्रमुखांनी नियोजन करावे. अकुशलमध्ये मिळणारा निधी मत्ता निर्मितीसाठी उपयोगात आणण्यासाठी कार्यवाही करावी. चिखलदरा पंचायत समितीतील जैतादेही येथे या योजनेअंतर्गत शाळेचे व अंगणवाडी परिसरातील रस्ते व इतर विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत. अशी मूलभूत आणि आवश्यक ती कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश ठाकूर यांनी दिले.

कार्यशाळा घेण्याचे निर्देश
मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी व कृषी, गावपातळीवरील आवश्यक कामे, वने आदी कामे होण्यासाठी लोकसहभागिता वाढविणेही गरजेचे आहे. त्यासाठी सरपंच, उपसरपंच, पंचायत समिती सभापती, बचत गट यांची तालुका स्तरीय कार्यशाळा घेण्यात यावी. नोंदणीकृत बांधकाम मजुरांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा, तसेच नोंदणीचे काम गतीने राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.