रोचक कथा हिमाचल प्रदेशातील ‘बिजली महादेव’ मंदिराची


हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यामध्ये असलेल्या शिवमंदिराशी निगडीत रहस्याचा उलगडा आजतागायत होऊ शकलेला नाही. उंच पहाडांच्या सान्निध्यात असलेल्या या मंदिराच्या नजीकच पार्वती आणि बियास नदींचे संगम आहेत. असे म्हटले जाते, की या मंदिरावर दर बारा वर्षांनी वीज कोसळते, पण तरीही या मंदिराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. दर बारा वर्षांनी घडणारी ही घटना गेल्या अनेक शतकांपासून घडत आली असल्याची मान्यता आहे. याच रहस्याशी निगडीत काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या.

पौराणिक कथांच्या अनुसार या मंदिराच्या जवळ असणारी खोल दरी सापाप्रमाणे लांबलचक आणि वळणावळणांची आहे. ही दरी वास्तविक सर्प असून, या सर्पाचा वध महादेवांनी केला असल्याचे म्हटले जाते. दर बारा वर्षांनी महादेवांच्या आज्ञेनेच या मंदिरावर वीज कोसळत असून, वीज कोसळल्यानंतर या मंदिरातील शिवलिंग खंडित होते. या खंडित झालेल्या शिवलिंगाची मलमपट्टी करण्याच्या उद्देशाने मंदिरातील पुजारी शिवलिंगावर ताजे लोणी लिंपतात. या लोण्याने शिवलिंगाला झालेली ‘जखम’ भरून येत असल्याची आख्यायिका असल्याने या महादेवाला ‘मख्खन महादेव’ या नावानेही संबोधले जाते. बिजली महादेव किंवा मख्खन महादेव म्हणून संबोधले जाणारे हे महादेव मंदिर कुल्लुपासून सुमारे अठरा किलोमीटर अंतरावर असून, मथान या ठिकाणी आहे.

या मंदिराशी निगडीत आणखी एक आख्यायिका आहे. या आख्यायिकेच्या अनुसार या मंदिरामध्ये कुलान्त नामक दैत्य रहात असे. एकदा सर्व सृष्टीचा आणि प्राणीमात्रांचा विनाश करण्याच्या उद्देशाने त्याने बियास नदीचे पाणी अडविले. त्याच्या या कृत्याने महादेव क्रोधित झाले. महादेवांनी कुलान्ताच्या शेपटीला आग लावली, आणि त्रिशुळाने कुलान्ताच्या शिरावर वर करून त्याचा वध केला. याच कुलान्ताचे शरीर एका पर्वतामध्ये परिवर्तित झाले, आणि त्यापासून कुल्लू या ठिकाणाचा उदय झाला असल्याची ही आख्यायिका असून कुलान्ताचा वध करणारे महादेव बिजली महादेव म्हणून येथील मंदिरामध्ये विराजमान झाले असल्याची मान्यताही येथे रूढ आहे.

Leave a Comment