पर्यावरण सुरक्षेसाठी या ग्रामपंचायतीचा अनोखा निर्णय


हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील झाडमाजरी औद्योगिक क्षेत्रातील भटोलीकला ग्रामपंचायतीच्या वतीने पर्यावरणाचे संरक्षण व्हावे या उद्देशाने एक अनोखा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी आयोजित केल्या गेलेल्या विशेष बैठकीमध्ये हा निर्णय घोषित करण्यात आला असून गावातील प्रत्येक नवजात अर्भकाच्या जन्मानंतर सबंधित परिवाराला किमान एका वृक्षाची लागवड करणे बंधनकारक असणार आहे. वृक्ष लागवड झाल्यानंतर संबंधित वॉर्डाच्या सभासदांना, नव्याने लावलेल्या वृक्षाची योग्य देखभाल केली जात असल्याची खात्री पटल्यानंतरच नवजात अर्भकाचे नाव पंचायतीच्या रजिस्टरमध्ये नोंदले जाणार आहे.

अश्या प्रकारचा निर्णय घेणारी ही ग्रामपंचायत देशातील पहिली वाहिली ग्रामपंचायत ठरली असून, लोकांना झाडे लावण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते. तसेच हा निर्णय लोकांवर लादला न जाता, या निर्णय अंमलात आणण्यासाठी लोकांना सहकार्य करण्याची विनंती केली जात असल्याचे समजते. हिमाचल प्रदेशमध्ये सोलन हा जिल्हा महत्वपूर्ण मानला जात असून, राज्यातील सर्वाधिक उद्योग, कारखाने याच जिल्ह्यामध्ये प्रस्थापित आहेत. या कारणाने या जिल्ह्यामध्ये प्रदूषणाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणून पर्यावरणाचे संरक्षण आणि वृक्षारोपण यांच्याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने भटोलीकला ग्रामपंचायतीच्या वतीने हा अनोखा निर्णय घेण्यात आला आहे.

वाढते प्रदूषण आणि त्यायोगे पर्यावरणाचे होत असणारे नुकसान यांचे दुष्परिणाम अनेक विकार-आजारांच्या माध्यमातून पहावयास मिळत आहेत. तसेच दरवर्षी कमी होत चाललेला पाऊस आणि वाढत जाणारा उन्हाळा हे देखील पर्यावरणाच्या असंतुलनाचे परिणाम आहेत. म्हणूनच ग्राम पंचायत, दर अर्भकाच्या जन्मानंतर, अर्भकाचा जन्म झालेल्या परिवाराने वृक्षाची लागवड करण्याबाबत आग्रही असून, परिवाराने वृक्षाची लागवड केली असून, त्याची देखभाल व्यवस्थित होत असल्याचे रिपोर्ट आल्यानंतरच त्वरित नवजात अर्भकाची नावनोंदणी केली जाणार असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment