ठाकरे सरकारची पूरग्रस्त भागासाठी मोठी घोषणा; छगन भुजबळांनी दिली माहिती!


मुंबई – कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना गेल्या २ दिवसांपासून पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. त्यासोबतच पावसाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली अशा काही जिल्ह्यांना देखील झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या असून अनेक ठिकाणी पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये शासकीय नियमांनुसार या भागांमधील नागरिकांना मोफत धान्य आणि शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात येणार असल्याची घोषणा अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे.

पावसाचा आणि पुराचा तडाखा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील ज्या भागांना बसला आहे, त्या भागातील नागरिकांना मोफत धान्य वाटपाची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. त्यासाठी काही मूलभूत अटी घालण्यात आल्या आहेत. छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये याची माहिती दिली आहे. पाऊस आणि पुरामुळे लोकांची घरेदारे गेली. घरातील सामान वाहून गेले. अनेक लोकांना मदतीची आवश्यकता असल्यामुळे त्यामुळे दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी जे क्षेत्र पाण्यात बुडाले असेल, घरे वाहून गेली असतील किंवा नुकसान झाले असेल, अशा निराधार कुटुंबांना राज्य सरकारकडून प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू, १० किलो तांदूळ, ५ लिटर रॉकेल मोफत देण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासकीय आदेश मार्च २०१९ला काढण्यात आला आहे. त्यात थोडा बदल करून ज्यांना गहू नको असेल, त्यांना तांदूळ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकणात प्रामुख्याने भाताचा समावेश जेवणात असतो. त्यामुळे तांदूळ देखील पुरवले जातील. यासोबतच तिथे उपलब्ध असलेली किंवा लोकांच्या आहारात असलेली ५ किलो डाळ देखील पुरवण्याचा निर्णय झाला असल्याचे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

या गोष्टींचे वाटप संबंधित जिल्ह्यातील स्थानिक प्रशासन किंवा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून केले जाणार आहे. त्याशिवाय, अशा ठिकाणी शिवभोजन थाळीचे देखील रोजच्या मर्यादेपेक्षा दुप्पट संख्येने वाटप करावे, असे निर्देश दिले आहेत. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र देखील चालू शकेल. ज्या ठिकाणी शिवभोजन केंद्र देखील उद्ध्वस्त झाले आहेत, अशा ठिकाणी बाजूच्या जिल्हा किंवा तालुक्यातून शिवभोजन केंद्रातून जेवणाची पाकिटे आणून वितरित करायची असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.

आपल्या पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांपासून सर्व स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावेत आणि नंतर ते आम्हाला कळवावेत असे निर्देश दिल्याचे देखील छगन भुजबळ यांनी सांगितले. परिस्थिती जोपर्यंत सुरळीत होत नाही, ही मदत तोपर्यंत दिली जाईल. काही ठिकाणी दोन दिवसांत सगळे सुरळीत होईल, काही ठिकाणी जास्त वेळ लागेल. पण काही कमी पडू दिले जाणार नाही. स्थानिक प्रशासनाला यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार दिल्याचे देखील छगन भुजबळ यांनी नमूद केले.