नदीकाठच्या नागरिकांनी सुरक्षिततेसाठी स्थलांतरीत व्हावे – जलसंपदामंत्री जयंत पाटील


मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यभरात जोरदार पाऊस सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील परिस्थिती तीव्र आणि गंभीर होत चालली आहे. प्रशासनाने कालपासूनच सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत मात्र काळजी म्हणून नेहमी संकटात असणाऱ्या गावातील नागरिकांनी आपली जनावरे, महत्त्वाच्या वस्तू घेऊन स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

सांगलीत परिस्थिती गंभीर होत चालली आहे. लोकप्रतिनिधी, सरपंच, यंत्रणेने सुरक्षिततेबाबत ताबडतोब हालचाली कराव्यात, शिवाय तेथील प्रशासनालाही सूचना दिल्या आहेत. जलसंपदा विभाग धरणांच्या पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवून आहे तसेच कर्नाटक सरकारशी संपर्कात आहोत. शिवाय प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या सातत्याने संपर्कात असल्याचे पाटील यांनी सांगितले.

एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. मात्र पाऊस खूप आहे. त्यामुळे काठावरच्या गावातील नागरिकांनी परिस्थिती बिघडण्याच्या आत बाहेर पडावे. पश्चिम महाराष्ट्राने अशी अनेक संकट पाहिली आहेत. आपण या संकटालाही तोंड देऊ, असेही पाटील यांनी म्हटले आहे.