भारत बायोटेकचा ब्राझीलसोबतचा कोव्हॅक्सिन लस करार संपुष्टात


नवी दिल्ली – ब्राझीलसोबतचा भारत बायोटेकचा कोव्हॅक्सिन लस करार संपुष्टात आला आहे. २४ नोव्हेंबर २०२० रोजी कंपनीने ब्राझीलच्या प्रेशिया मेडिकामेंटोस आणि एनविस्किया फार्मासिटिकल्स एलएलसी कंपन्यांसोबत करार केला होता. कंपनीने हा करार ब्राझीलमध्ये लस खरेदीत भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर रद्द केल्याचे बोलले जात आहे. प्रेशिया मेडिकामेंटोस कंपनीसोबत ब्राझीलमध्ये भारत बायोटेक भागिदार आहे. तात्काळ सामंजस्य करार रद्द करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यानंतरही कंपनी कोव्हॅक्सिनसाठी नियमांची प्रक्रिया पूर्ण करून मान्यता मिळवण्याचा प्रयत्न करेल. औषध नियामक संस्था एएनव्हीआयएसएला सहकार्य करेल, असे भारत बायोटेककडून सांगण्यात आले आहे.

ब्राझील सरकारने यापूर्वी भारतीय लस उत्पादक कंपनी भारत बायोटेकसोबतचा ३२ कोटी डॉलर्सचा लस खरेदी करार स्थगित केला होता. भारत बायोटेककडून ब्राझीलने कोव्हॅक्सिनचे २० मिलियन डोस खरेदी करण्यासाठी करार केला होता. या करारमुळे भ्रष्टाचाराच्या चर्चेला तोंड फुटले असून, राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो वादात सापडण्याची चिन्हे आहेत. भारत बायोटेकसोबत ब्राझीलने केलेल्या लस खरेदी करारात भ्रष्टचार झाल्याचा आरोप व्हिसलब्लोअरनी केला आहे. यावर सरकारकडून स्पष्टीकरणही देण्यात आले, पण त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. त्यानंतर आता हा मुद्दा ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयात गेला असून, ब्राझील सरकारने या खरेदी कराराला स्थगिती दिली.

भारत बायोटेककडून लस खरेदी करण्यासाठी ब्राझील सरकारने करार केला होता. भारत बायोटेककडून लस खरेदी हाच मूळ वादाचा विषय ठरला होता. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस खरेदी करण्यासाठी ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांनी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबद्दल राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांना माहिती होती, पण त्यांनी लस खरेदी करार न थांबवल्यामुळे ब्राझीलला महागडी लस खरेदी करावी लागली. ब्राझीलकडे फायझरची लस खरेदी करण्याचा पर्याय होता. पण त्यांनी भारत बायोटेककडून महागडी लस खरेदी केली, असा सवालही उपस्थित केला जात आहे. लस खरेदी कराराबद्दल करण्यात आलेले हे आरोप सिद्ध झाले, तर बोल्सोनारो यांना पद गमवावे लागू शकते.