मुंबई लोकल संदर्भात पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली महत्वाची माहिती


मुंबई – मुंबईतील लोकल रेल्वे सेवा कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याची मागणी होत आहे. पण, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे सरकारने आणि मुंबई महानगरपालिकेने तुर्तास सर्वसामान्यांसाठी लोकलमधून प्रवास करण्यावरील बंदी कायम ठेवली आहे. पण, दिवसेंदिवस मुंबईकरांना प्रवास करताना त्रास सोसावा लागत आहे. अशातच पालकमंत्री अस्लम शेख यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

अस्लम शेख लोकल सुरु करण्याबातत म्हणाले, लोकल सेवा ७० टक्के लसीकरण पुर्ण झाल्याशिवाय सुरु करता येणार नाही. तसेच शहरातील इतर निर्बंध सुद्धा हटवता येणार नाहीत. अस्लम शेख म्हणाले, जोपर्यंत लसीकरण ६० ते ७० टक्के पुर्ण होत नाही. तोपर्यंत सर्व खुले करणे योग्य ठरणार नाही. जशी-जशी सुट देता येईल, ते आम्ही देतच असतो. तसेच जी पाऊले आम्ही उचलत आहोत, ती योग्यच उचलत असल्याचे, असे सर्वोच्च न्यायालयाने देखील सांगितले असल्याचे अस्लम शेख एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे. आज लसीकरण देखील थांबलेले आहे. अस्लम शेख यावर म्हणाले, केंद्र सरकारचे लसीकरणाबाबतचे नियोजन आणि अमलबजावणी पुर्णपणे फेल झाले आहे. मुंबईत आम्हाला २० दिवस लसीकरण केंद्र बंद ठेवावे लागले. केंद्र सरकार स्वतः लसी देऊ शकत नाही. आमच्याकडे पैसे असूनही आम्हाला लसी खरेदी करता येत नसल्यामुळे आम्ही केंद्राला निवेदन दिले की, जगात ज्यांनी लस बनवली आहे. त्यांना भारतात आणा. बाकी सगळे राज्य देखील लस घ्यायला तयार आहेत. सरसकट सगळ्यांचे लसीकरण झाले, तरच लवकरात लवकर आपला देश उघडता येईल.