अश्लील चित्रपट प्रकरणी राज कुंद्रा दोषी ठरला, तर एवढ्या वर्षाची होऊ शकते शिक्षा?


मुंबई – व्यावसायिक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला सोमवारी गुन्हे शाखेने अश्लील चित्रपट निर्मितीच्या आरोपप्रकरणी अटक केली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेने मढ परिसरातील एका बंगल्यावर फेब्रुवारीमध्ये छापा घालून अश्लील चित्रपट बनविणाऱ्या टोळीला अटक केली होती. हे चित्रपट विविध समाजमाध्यमांद्वारे रिलीज केले जात होते. कुंद्रा या गुन्ह्यात मुख्य आरोपी असून, त्याच्याविरोधात पुरेसे पुरावे असल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला असल्यामुळे राज कुंद्रा Porn apps Case अडकण्याची शक्यता आहे. या प्रकरणात राज कुंद्रा दोषी आढळला, तर त्याला तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

मुंबई पोलिसांच्या एका पथकाने फेब्रुवारी महिन्यात मढ येथील ग्रीन पार्क बंगल्यावर धाड टाकली होती. याठिकाणी पॉर्नोग्राफिक शुटिंग होत असल्याच्या माहितीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांनी त्यावेळी पाच जणांना अटक केली होती. तर एका मुलीची सुटका केली होती. अटक करण्यात आलेल्या पाच जणांमध्ये दोन अभिनेत्यांचा, तर दोन तरुणींचा समावेश आहे. या दोन्ही तरुणी अभिनयाच्या क्षेत्रात नशिब आजमवण्यासाठी आल्या होत्या. मात्र, त्या पॉर्नोग्राफिक व्हिडीओ तयार करणाऱ्या प्रोडक्शन हाऊसच्या जाळ्यात अडकल्या. ही मोठी कारवाई केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

भारतात पोर्नोग्राफी अर्थात अश्लील चित्रपट व त्यासंबंधित प्रकरणाशी कडक कायदा आहे. अशा प्रकरणात गुन्हा दाखल करताना माहिती तंत्रज्ञान कायद्याबरोबर आयपीसीच्या विविध कलमांचाही समावेश असतो. तंत्रज्ञानात झपाट्याने होत असलेले बदल आणि मानवी आयुष्यात त्याचे होणारे दुष्परिणाम या अनुषंगाने या कायद्यामध्ये दुरुस्त्याही करण्यात आलेल्या आहेत.

व्हिडीओ, ऑडिओ आणि इतर स्वरूपात अश्लीलतेचा आणि लैगिंक शोषणाचा प्रसार करणारे साहित्य तयार करणे वा इतरांना पाठवणे पोर्नोग्राफी प्रतिबंध कायद्याने गुन्हा आहे. अश्लील व्हिडीओ बनवणेही गुन्हा असून, चाईल्ड पोर्नोग्राफी बघणेही गुन्हा ठरवण्यात आलेले आहे. या प्रकरणात दोषी आढळल्यास सुधारित माहिती तंत्रज्ञान कायदा २००८ मधील कलम ६७ (अ) आणि भादंवि कलम २९२, २९३, २९४, ५००, ५०६ आणि ५०९ यानुसार शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पहिल्यांदाच दोषी आढळलेल्या आरोपीला ५ वर्षांचा तुरुंगवास किंवा १० लाखांचा दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. दुसऱ्यांदा असा गुन्हा केल्यास ७ वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे.