पंकजा मुंडे शेवटच्या श्वासापर्यंत भाजपमध्येच राहतील – सुधीर मुनगंटीवार


मुंबई – खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न देण्यात आल्यामुळे तसेच पंकजा मुंडे मागील काही वक्तव्यांवरून भाजपवर नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर पंकजा मुंडे यांची ओबीसी मोर्चाच्या बैठकीस अनुपस्थिती दिसल्यामुळे, नव्या चर्चांना उधाण आले आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या पार्श्वभूमीवर महत्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

जे कार्यकर्ते पक्षावरही प्रेम करतात व कधीकधी पक्षातील विशिष्ट नेत्यावर इतर नेत्यांच्या तुलनेत थोडे जास्त प्रेम करतात. तर, अशा काही कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी राजीनामा दिला, हा राजीनामा दिल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांना समजावताना काही शब्दांचा उपयोग केला असेल, पण त्याचा अर्थ त्या नाराज असल्याचे मला वाटत नाही. पंकजा मुंडे या शेवटच्या श्वासापर्यंत पक्षाच्या बाहेर जाण्याचा विचार देखील करू शकत नसल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत.

भाजपच्या प्रमुख नेत्यांपैकी पंकजा मुंडे या एक आहेत आणि केवळ याच जन्मात नाही तर पुढील जन्मातही त्या भाजपमध्येच राहतील. भाजपमध्ये आपले म्हणणे मांडणे म्हणजे नाराजी नसल्याचेही सुधीर मुनगंटीवार म्हणाल्याचे सांगण्यात आले आहे.