जगामध्ये अस्तित्वात आहेत जीवजंतूंच्या अशाही प्रजाती


आपण राहतो ते जग अतिशय सुंदर आणि अनेक आश्चर्यांनी परिपूर्ण आहे. यामध्ये अनेक प्रजातींच्या दुर्मिळ जीवजंतूंचा समावेश आहे. अगदी योगायोगानेच या जीवजंतूंचा संपर्क मनुष्यांशी आला आणि या जीवजंतूंची ओळख जगाला झाली. त्यापैकी एक ‘अमीथिस्ट स्टार्लिंग’ नामक सुंदर पक्षी आहे. अतिशय देखणा, जांभळ्या रंगाचा हा पक्षी अफ़्रिकेमधे सापडतो. या पक्ष्याला स्थानिक भाषेमध्ये ‘व्हायोलेट स्टार्लिंग’ किंवा ‘प्लम कलर्ड स्टार्लिंग’ असे ही म्हटले जाते. या पक्ष्यांचा प्रजातीमध्ये नर रंगेबिरंगी असून, मादी मात्र भुऱ्या रंगाची असते. हे पक्षी मुख्यतः झाडांवर राहत असून, जमिनीवर क्वचितच उतरून येतात.

‘गोथ चिकन’ ही कोंबड्यांची प्रजाती अतिशय दुर्मिळ असून, ही प्रजाती ‘आयाम केमानी’ या नावानेही ओळखली जाते. ही कोंबडी संपूर्णपणे काळी असून हिची पिसे, चोच इतकेच नव्हे तर या कोंबडीचे अवयव, हाडे आणि मांसही काळेच असते. इंडोनेशियातील सुमात्रा येथे या कोंबड्यांची प्रजाती पहावयास मिळते. ‘आयाम’ या शब्दाचा इंडोनेशियन भाषेतील अर्थ ‘चिकन’ असा असून, या कोंबड्या मूळच्या ‘केमानी’ या गावातल्या असल्याने या प्रजातीला हे नाव देण्यात आले आहे. प्राचीन काळी या कोंबड्या धार्मिक विधींसाठी बळी देण्याच्या कामी वापरण्यात येत असत. अजूनही या कोंबड्यांचा वापर केवळ याच निमित्ताने होत असतो.

‘पापिलीयो अँड्रोजियस’ नामक फुलपाखराची प्रजाती दुर्मिळ असून, हे फुलपाखरू ‘बायलॅटरल जिनँड्रोमॉर्फ’ या पद्धतीमध्ये मोडणारे आहे, म्हणजेच हे एकच फुलपाखरू अर्धे नर आणि अर्धे मादी आहे. ‘पपिलिओनिडे’ या फुलपाखरांच्या जातीतील ही प्रजाती आहे. ही प्रजाती मेक्सिको, आर्जेन्टिना, फ्लोरिडा आणि आसपासच्या परिसरांमध्ये आढळते.

‘ब्लॅक डायमंड अॅपल्स’ या सफरचंदांची प्रजातीही अतिशय दुर्मिळ असून, हे सफरचंद नावाप्रमाणेच काळे दिसते. तिबेटच्या पर्वतराजीमध्ये ही काळ्या सफरचंदांची झाडे आढळून येतात. तसेच ‘न्यीन्ग्ची’ नामक शहरामध्ये सहज उपलब्ध असतात. या सफरचंदांचे उत्पादन अतिशय मर्यादित असल्याने यांची बाजारपेठेमध्ये किंमत जास्त असून, केवळ महागड्या सुपरमार्केट्समध्ये ही सफरचंद उपलब्ध असतात.

Leave a Comment