कुर्डी – वर्षातून केवळ महिनाभरच अवतरणारे गाव


गोवा म्हटले, की विशाल सागरी किनारा, पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलेले सुंदर बीच, चटकदार समुद्री खाद्य आणि अर्थातच फेनी हे दृश्य आपल्या डोळ्यांसमोर अगदी सहज उभे राहते. पण गोव्याची आणखी एक खासियत आहे येथील वर्षातून एकदाच, केवळ महिन्याभरासाठीच अवतरणारे कुर्डी गाव. उर्वरित अकरा महिने हे गाव पाण्याखाली गडप होऊन जाते. य गावाचे रहिवासी आता अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत. पण जेव्हा हे गाव पाण्यातून अवतरते, तेव्हा सर्व ग्रामस्थ आपल्या गावी आवर्जून एकत्रित होतात, आणि मोठा उत्सव साजरा करतात.

शहराच्या धावपळीपासून दूर, पर्वतराजीच्या कुशीमध्ये वसलेले हे कुर्डी गाव. सालौलिममधील खळाळता झरा या गावातून वहात असे. झुआरी नदीचे पाणी या झऱ्यामध्ये वाहत असे. असे हे कुर्डी गाव एके काळी अतिशय संपन्न, समृद्ध होते. १९८६ साली झुआरी नदीवर गोव्यातील पहिले धरण बांधले गेले आणि या धरणाच्या पाणीसाठ्याखाली हे लहानसे गाव लुप्त झाले. मात्र धरणाचे पाणी दरवर्षी उन्हाळ्यामध्ये, साधारण मे महिन्याच्या दिवसांमध्ये कमी झाले, की हे गाव पुन्हा अवतरते. गावातील आता साफ कोलमडलेल्या घरांचे अवशेष, मंदिरे, आणि माळरान सर्व काही पुन्हा दृष्टीस पडू लागते. एके काळी या गावामध्ये तीन हजारांच्या आसपास वस्ती होती. गावातील जमीन सुपीक असल्याने शेतीचा व्यवसाय उत्तम होता, सर्व कुटुंबे खाऊन पिऊन सुखी होती. काजू, आंबे, पोफळी, फणस, नारळ मुबलक प्रमाणांत होत असत. सर्व धर्मांचे आणि सर्व जातीचे लोक इथे मोठ्या गुण्या-गोविंदाने एकत्र राहत असत. या गावामध्ये अनेक मंदिरे, एक मशीद आणि एक चर्चही होते.

मात्र हे चित्र १९६१ सालानंतर पालटले. गोवामुक्ती आंदोलनानंतर येथे असलेले पोर्तुगीझ अधिपत्य संपुष्टात आले. त्यावेळी गोव्याचे पहिले मुख्य मंत्री दयानंद बांदोडकर यांनी कुर्डी गावाला भेट देऊन तेथे गोव्यातील पहिले धरण बांधले जाणार असल्याची योजना गग्रामस्थांच्या कानावर घातली. त्यामुळे आपली राहती घरे, शेते सर्व काही सोडून अन्य गावांमध्ये स्थलांतर करण्यावाचून दुसरा कोणताच पर्याय ग्रामस्थांच्या समोर नव्हता. ग्रामस्थांना भरपाई म्हणून पैसे आणि जमिनी देण्यात आल्या असल्या, तरी स्वतःचे नांदते घर आणि वर्षानुवर्षांच्या मेहनतीने फळलेल्या बागा सोडून जाण्याचे दुःख अर्थातच मोठे होते.

मात्र या प्रकल्पामुळे दक्षिण गोव्यातील शेतीच्या सिंचनासाठी, पिण्यासाठी आणि इतर उद्योग व्यवसायांसाठी धरणाची आवश्यकता असल्याने ग्रामस्थांनी या प्रकल्पाला मंजुरी देत कुर्डीवासियांनी गावातून अखेरीस स्थलांतर केले. त्यानंतर जेव्हा धरण बनले, तेव्हा संपूर्ण कुर्डी गावाला आणि त्याच्या आसपासच्या परिसराला जलसमाधी मिळाली. तेव्हापासून दर वर्षी मे महिन्यामध्ये धरणाचे पाणी कमी होते आणि कुर्डी गाव पुन्हा दृष्टीस पडू लागते. त्यावेळी येथून स्थलांतरित झालेले ग्रामस्थ पुन्हा आवर्जून एकत्र येतात, आणि जुन्या आठवणी जाग्या करीत मोठ्या आनंदाने उत्सव साजरा करतात.

Leave a Comment