हे आहेत जगातील सर्वात महागडे खाद्यपदार्थ


तुम्हाला जर कोणी पाच हजार डॉलर्स दिले, तर ते पैसे तुम्ही अनेक प्रकारे खर्च करू शकता. त्यातून तुम्ही एखादी बऱ्यापैकी गाडी खरेदी करू शकता, कुठे तरी पर्यटनाला जाऊ शकता, किंवा तुम्ही तुमच्या पसंतीचा एखादा खाद्यपदार्थ खाऊ शकता. आता पाच हजार डॉलर्सचा खाद्यपदार्थ कोणता हा विचार तुमच्या मनामध्ये येत असेल, तर जगामध्ये असे अनेक खाद्यपदार्थ आहेत, ज्यांची किंमत, आपण कल्पना ही करू शकणार नाही इतकी जास्त आहे. हे पदार्थ कोणते, ते जाणून घेऊ या.

‘द गोल्डन ओप्युलन्स संडे’ या आईस्क्रीमच्या एका सर्व्हिंगची किंमत तब्बल एक हजार डॉलर्स आहे. ‘ताहितियन व्हॅनीला बीन आईस्क्रीम’ हे या पदार्थामध्ये प्रामुख्याने वापरले जात असून, यावर अस्सल सोन्याचा वर्ख चढविलेला असतो. इतकेच नाही तर कॅव्हीयार, म्हणजेच एका विशिष्ट माशाची मुरविलेली अंडीही यावर घातली जातात. कॅव्हीयार जा जगातील सर्वात महाग खाद्यपदार्थांपैकी एक असून, इरानियान बेलूगा माशापासून तयार केले जाणारे कॅव्हीयार प्रती किलो वीस हजार डॉलर्स किंमतीला विकले जात असते. हे कॅव्हीयार या आईस्क्रीमवर घालण्यासाठी वापरले जात असल्याने याची किंमत जास्त आहे.

‘बेर्कोज् बिलियन डॉलर पॉपकॉर्न’ हे जगातील सर्वाधिक किंमतीचे पॉपकॉर्न असून, यातील केवळ एका लाहीची किंमत पाच डॉलर्स आहे. म्हणजे तयार पॉपकॉर्न ज्या बॅगमध्ये भरून विकले जातात, तशी बॅगभरून जर ‘बेर्कोज्’ पॉपकॉर्न विकत घ्यायचे झाले, तर त्यासाठी तब्बल अडीच हजार डॉलर्स मोजावे लागतात. जैविक पद्धीने तयार केलेली साखर, व्हरमॉन्ट बटर, खास बर्बन व्हॅनीला, आणि जगातील सर्वाधिक किंमतीचे ‘हिमालयन’ मीठ वापरून ही पॉपकॉर्न तयार केली जातात. या पॉपकॉर्नप्रमाणेच ‘द 24k गोल्ड पिझ्झा’ हा जगातील सर्वाधिक किंमतीचा पिझ्झा आहे. हा पिझ्झा तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य सर्वसामान्य दुकानांमध्ये मिळणारे नाही. या पिझ्झावर देखील टॉपिंग म्हणून अस्सल सोन्याचा वर्ख, कॅव्हीयार, ट्रफल, ‘फॉय ग्रा’ (बदकाचे लिव्हर), स्टिल्टन चीज सारखे अतिशय महाग पदार्थ वापरले जात असून, या एका पिझ्झाची किंमत दोन हजार डॉलर्स आहे.

‘द 777 बर्गर’ या नावाने प्रसिद्ध असणारा बर्गर सामान्य बर्गर्सच्या मानाने हटके असून, याची किम्मत याच्या नावातच दडली आहे. या बर्गरची किंमत ७७७ डॉलर्स इतकी आहे. हा बर्गर तयार करण्यासाठी खास कोबे बीफ, लॉब्स्टर, फॉय ग्रा, आणि शंभर वर्षे जुने बल्सामिक व्हिनेगर वापरण्यात येते. ‘युरोपियन व्हाईट ट्रफल्स’ नामक मूळची फ्रांस आणि इटलीमध्ये वापरली जाणारी आणि आता जगभरातील सर्वाधिक किंमतीच्या पदार्थांमध्ये वापरली जात असणारी ‘फंगस’ किंवा बुरशी जमिनीखाली तयार केली जाते, याची किंमत पार पाऊंड साडेतीन हजार डॉलर्सपेक्षाही अधिक आहे. या फंगसचे अगदी लहानसे तुकडे सजावटीसाठी वापरल्याने एखाद्या पदार्थाची किंमत खूपच वाढते. ‘द फ्ल्युअरबर्गर ५०००’ या बर्गर मीलची किंमत तब्बल पाच हजार डॉलर्स असून, या बर्गरमध्येही ट्रफल्स आणि फॉय ग्राचा वापर केलेला असतो. या बर्गरमध्ये १९९५ सालची ‘शेटो पेट्रस’ ही अतिशय महागडी वाईनही समाविष्ट असल्याने या बर्गर मीलची किंमत पाच हजार डॉलर्स आहे.

Leave a Comment