हिल्ट हाऊस – जगातील सर्वात जुने शाकाहारी रेस्टॉरंट


भोजन, किंवा अन्न ही मनुष्याची मूलभूत आवश्यकता आहे. जसजसा काळ बदलला, तसे मनुष्याचे भोजनही बदलत गेले. घरामध्ये भोजन बनविले जात असतानाच अधून मधून रेस्टॉरंटमधले चविष्ट भोजन चाखण्याची परंपराही लोकप्रिय होऊ लागली आणि आजच्या काळाबद्दल बोलायचे झाले, तर स्वीगी, उबरइट्स सारख्या माध्यमांच्या द्वारे आपली आवडती रेस्टॉरंट्स तर चक्क आपल्या घरामध्येच येऊन दाखल झाली आहेत. आताच्या काळामध्ये सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ सर्व्ह करणारी रेस्टॉरंट्स ठिकठीकाणी उपलब्ध झाल्याने देशी पदार्थांच्या सोबत विदेशी पदार्थही आपल्या खाद्यपरंपरेमध्ये सहजी सामावून गेले आहेत. त्यातही काही रेस्टॉरंट्स अशीही आहेत, जी ग्राहकांसाठी अनेक वर्षांपूर्वी खुली झाली, पण या रेस्टॉरंट्सशी निगडित काही खासियतींमुळे ही रेस्टॉरंट्स आज ही खूप प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत.

अश्याच रेस्टॉरंट्स पैकी एक आहे स्वित्झर्लंड देशातील झ्युरिक शहरामधील ‘हाऊस हिल्ट’ हे रेस्टॉरंट. हे रेस्टॉरंट गेल्या एका शतकापासून ग्राहकांच्या सेवेमध्ये सादर असून, हे जगातील सर्वात जुने शाकाहारी रेस्टॉरंट म्हणून प्रसिद्ध आहे. या रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह केल्या जाणाऱ्या एकाहून एक सरस अश्या शाकाहारी खाद्यपदार्थांनी युरोपियन शाकाहारी भोजनाची जणू व्याख्याच बदलून टाकली आहे. हे रेस्टॉरंट आजच्या काळामध्ये देखील झ्युरिक शहरातील सर्वात प्रसिद्ध रेस्टॉरंट्स पैकी एक असून, जगातील सर्वात जुने शाकाहारी रेस्टॉरंट म्हणून या रेस्टॉरंटचे नाव गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले आहे.

झ्युरिकचे निवासी असणाऱ्या हिल्ट परिवाराने या रेस्टॉरंटची स्थापना १८९८ साली केली होती. तेव्हापासून आजतागायत गेल्या अनेक पिढ्या हे रेस्टॉरंट चालवीत आहेत. हे रेस्टॉरंट सुरु झाले तेव्हा सुरुवातीला येथे केवळ स्थानिक खाद्यपदार्थ मिळत असत. यामध्ये मुख्यत्वे बटाटे आणि कंदभाज्यांपासून बनविलेल्या पदार्थांचा समावेश असे. मात्र जसजशी या रेस्टॉरंटची धुरा येणाऱ्या नव्या पिढ्यांच्या हाती आली, तसतसे या रेस्टॉरंटचे रूपही पालटले. आजच्या काळामध्ये या रेस्टॉरंटमध्ये भारतीय, आशियायी, मेडीटेरेनियन, स्विस आणि इतरही अनेक पद्धतीचे शाकाहारी पदार्थ ग्राहकांसाठी सर्व्ह केले जातात. त्याचबरोबर ग्राहकांना वाचण्यासाठी येथे हजारो कुक-बुक्सचा ही संग्रह आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये या रेस्टॉरंटच्या अनेक शाखा झ्युरिकमध्ये सुरु करण्यात आल्या आहेत.

स्विस जनता मुख्यत्वे मांसाहारी समजली जाते. त्यामुळे अश्या ठिकाणी शाकाहारी रेस्टॉरंट इतके लोकप्रिय होणे ही मोठी विशेष गोष्ट आहे. हे रेस्टॉरंट ज्या काळी सुरु झाले, त्याकाळी भाज्या किंवा शाकाहारी पदार्थ हे निर्धन व्यक्तींचे भोजन समजले जाण्याची पद्धत स्वित्झर्लंडमध्ये रूढ होती. त्याकाळी स्वित्झर्लंडमधेच नव्हे, तर संपूर्ण युरोप खंडामध्ये मांसाहार रूढ होता. किंबहुना एखादी व्यक्ती शाकाहारी आहे किंवा मांसाहारी आहे याचा थेट संबंध त्या व्यक्तीच्या सामाजिक आणि आर्थिक स्तराशी जोडला जात असे. त्याकाळी भाज्यांमध्ये केवळ बटाटे, इतर कंदभाज्या, पनीर (कॉटेज चीज) इत्यादी पदार्थांचा शाकाहारी भोजनामध्ये समावेश असे. अश्या काळामध्ये हे संपूर्ण शाकाहारी रेस्टॉरंट कसे सुरु झाले, याची कथाही मोठी रोचक आहे. १८९० साली अँब्रोसुइस हिल्ट यांना संधिवात असून, त्यांच्यासाठी मांसाहार संपूर्ण वर्ज्य करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यावेळी संपूर्ण शाकाहारी भोजन झ्युरिकमध्ये फारसे प्रचलित नसल्याने ‘द अॅब्स्टिनन्स’ नामक, संपूर्ण शाकाहारी भोजन तयार करणारे एकच रेस्टॉरंट संपूर्ण झ्युरिकमध्ये अस्तित्वात होते. या रेस्टॉरंटमध्ये भोजन करण्यास सुरुवात केल्यानंतर हिल्ट यांची शाकाहारी भोजनामधली रुची वाढू लागली.

शाकाहारी भोजनाचा प्रघात नसलेल्या झ्युरिक शहरामधील एकमेव शाकाहारी रेस्टॉरंटची परिस्थिती, ग्राहकांच्या अभावी अतिशय डबघाईला आली होती. त्यामुळे १९०४ साली हिल्ट यांनी हे रेस्टॉरंट खरेदी केले, आणि या रेस्टॉरंटमध्ये स्वयंपाकीण म्हणून कार्यरत असलेल्या मार्थाशी विवाह केला. त्यानंतर या रेस्टॉरंटचे नामकरण ‘हाऊस हिल्ट’ असे करण्यात आले.

त्याच काळाच्या दरम्यान आहारशास्त्राचे महत्व लोकांना पटायला लागले असून, शाकाहारी, संतुलित, पौष्टिक भोजनाची संकल्पना लोकप्रिय होऊ लागली होती. त्यामुळे हळू हळू हाऊस हिल्टमध्ये ग्राहकांची गर्दी वाढू लागली, आणि पाहता पाहता हे रेस्टॉरंट लोकप्रिय झाले. १९५१ साली हिल्ट यांच्या स्नुषा ‘वर्ल्ड व्हेजिटेरियन काँग्रेस’च्या निमित्ताने भारतामध्ये आल्या असता त्यांना खास भारतीय पद्धतीचे शाकाहारी भोजन अतिशय आवडले. त्यानंतर त्यांनी मायदेशी परतून भारतीय पद्धतीचे भोजन आपल्या रेस्टॉरंटमध्ये बनवविण्यास सुरुवात केल्यानंतर हे पदार्थ अतिशय लोकप्रिय झाले, आणि रेस्टॉरंट प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले. भारताचे पूर्व प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांनी देखील स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर असताना हाऊस हिल्टला खास भेट देऊन येथील भारतीय भोजनाचा आस्वाद घेतला होता.

१९७३ साली हाऊस हिल्टमध्ये आणखी एक मोठे परिवर्तन करण्यात आले. या रेस्टॉरंटमध्ये ‘हिल्ट व्हेजी’ ही नवी संकल्पना आणून त्याद्वारे रेस्टॉरंटमध्ये ‘सॅलड बार’, ‘टेक अवे काऊंटर’ आणि ‘ज्यूस काऊंटर’ सुरु करण्यात आले. त्याकाळी झ्युरीकमध्ये ही संकल्पना अतिशय नवी असल्याने ही नवी योजनाही संपूर्णपणे यशस्वी झाली, आणि ग्राहकांच्या पसंतीची पावतीही मिळवून गेली. आताच्या काळामध्ये हाऊस हिल्ट रेस्टॉरंटच्या अनेक मजली इमारतीमध्ये, पाचव्या मजल्यावर ‘हिल्ट अकादमी’ सुरु करण्यात आली असून येथे हौशी आणि व्यायसायिक कुक्सना शाकाहारी भोजन बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. हाऊस हिल्टची लोकप्रियता आता जागतिक पातळीवर पोहोचली असून, हाऊस हिल्टची ‘फ्लॅगशिप’ रेस्टॉरंट्स लवकरच न्यूयॉर्क आणि लॉस एंजिलीस येथेही सुरु होत आहेत.

Leave a Comment