बुरारीतील ‘त्या’ घरामध्ये मध्यरात्री अवतरतात भुते?


उत्तर दिल्लीतील बुरारी या ठिकाणी असलेल्या ‘त्या’ घरामध्ये सध्या दोन भाऊ रहात आहेत. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून या घरामध्ये या बंधूद्वयाचे वास्तव्य असून, या घरामध्ये रहाण्याचा निर्णय जेव्हा त्यांनी घेतला, तेव्हा घराजवळ राहणाऱ्या इतर लोकांनी या बंधूद्वयाचे मन वळविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. तसेच या घरामध्ये काही तरी अशुभ, अमंगल अदृश्य शक्ती असून दररोज मध्यरात्री या शक्ती अवतरत असल्याचेही शेजाऱ्यांनी म्हटले. मात्र व्यवसायाने सुतार असलेल्या या दोघा भावांचा निर्धार कायम राहिला आणि त्यांनी या घरामध्ये राहण्याचा निर्णय घेतला.

आजपासून बरोबर एक वर्ष आधी बुरारीतील याच घरामध्ये चुंदावत परिवारातील अकरा सदस्यांनी आत्महत्या केली होती. त्या काळी ही घटना सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या घटनांपैकी एक ठरली होती. सर्वसामान्य एकत्र कुटुंबांच्या प्रमाणे चुंदावत कुटुंबही एकत्र रहात असून, परिवारातील सदस्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद, वाद नव्हते. किंबहुना परिवारातील तरुण मुलीचे लग्न ठरले असल्यामुळे परिवारामध्ये आनंदाचे वातावरण होते. या परिवारजनांचे आपापसात संबंध चांगले होतेच, पण त्याशिवाय आसपास राहणाऱ्या लोकांशी देखील त्यांचे संबंध अतिशय चांगले होते. घरामध्ये कोणत्याही प्रकारची आर्थिक समस्याही नव्हती. म्हणूनच अश्या संपन्न, आणि आनंदी परिवारातील सर्व सदस्यांनी जेव्हा एकत्र आत्महत्या केली, तेव्हा सर्वच लोक चक्रावले. केवळ दिल्लीचेच नाही तर काही काळाकरिता संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेने आकृष्ट करून घेतले होते.

आता या घरामध्ये अहमद अली आणि अफसर अली हे दोघे भाऊ राहतात. हे दोघेही भाऊ चुंदावत परिवाराला चांगले ओळखत होते. या दोघा भावांना या घरामध्ये राहण्याची परवानगी चुंदावत परिवारातील एकमेव हयात सदस्य असलेल्या दिनेश चुंदावत यांनी दिली आहे. आपल्या परिवारातील सर्व सदस्यांच्या निधनानंतर दिनेश आणि त्यांची पत्नी या घरामध्ये दोन दिवस राहिलेही होते. पण व्यवसायाच्या निमित्ताने अन्यत्र रहात असणाऱ्या दिनेश यांना स्वगृही परतणेही गरजेचे असल्याने या घराची जबाबदारी दिनेश यांनी अली बंधूंवर सोपविली. तेव्हापासून या घरामध्ये अफसर आणि अहमद रहात आहेत. ते जेव्हा सुरुवातीला येथे राहण्यास आले, तेव्हा या घरामध्ये राहणे योग्य नसल्याचे इतरांचे म्हणणे होते. खुद्द अफसर आणि अहमद यांचे परिवार देखील या घरामध्ये राहण्यास तयार नव्हते, अखेरीस हे दोघे भौच या घरामध्ये वास्तव्यास आले.

आपण रहात आहोत या घरामध्ये एक-दोन नाही, तर तब्बल अकरा लोकांनी आत्महत्या केली आहे या कल्पनेने दोघे भाऊ अस्वस्थ होत असत. शिवाय आसपासच्या घरांमध्ये रहाणाऱ्या लोकांनी देखील या घरामध्ये अतृप्त शक्ती असल्याच्या अनेक गोष्टी या भावांना सांगितल्याच होत्या. त्यामुळे सुरुवातीचा काही काळ काहीश्या अस्वस्थ मनस्थितीमधेच गेला. पण जसजसे दिवस सरू लागले, तसतशी या भावांची भीड चेपली. हे घर देखील सर्वसामान्य घरांसाराखेच असून येथे कोणत्याही अदृश्य शक्ती वावरत नसल्याची खात्री दोघा भावांना पटली. आता या दोघा भावांनी या घराच्या तळमजल्यावर सुतारकामाचे वर्कशॉप सुरु केले असून, अधून मधून त्यांचे सहकारी या घरामध्ये मुक्कामासाठी येत असतात. इतर स्थानिक लोक मात्र आजही या घरापासून लांबच राहणे पसंत करतात.

Leave a Comment