भारतातील या ठिकाणी जाण्यास भारतीयांनाच नाही परवानगी


भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अंमलात आलेल्या संविधानाने लोकशाहीचा पुरस्कार करीत भारतीय नागरिकांना हर तऱ्हेचे स्वातंत्र्य दिले आहे. यामध्येच देशामध्ये कुठेही भ्रमंतीसाठी जाण्याचे स्वातंत्र्य देखील प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे. मात्र आपल्या देशामध्ये काही ठिकाणे अशीही आहेत जिथे जाण्याची भारतीय नागरिकांनाच परवानगी नाही. बेंगळूरू शहरामध्ये अस्तित्वात असलेल्या ‘उनो इन’ हॉटेलमध्ये जाण्याची परवानगी भारतीय नागरिकांना नव्हती. हे हॉटेल केवळ भारतामध्ये येणाऱ्या जपानी लोकांच्या मनोरंजनासाठी बनविण्यात आले होते. काही काळाने स्थानीय नागरिकांकडून या हॉटेलबाबत बेंगळूरू महापालिकेकडे अनेक तक्रारी आल्यानंतर महापालिकेने हे हॉटेल बंद करविले असल्याचे वृत्त एका लोकप्रिय दैनिकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले होते.

हिमाचल प्रदेशामध्ये कसोल या ठिकाणी असलेले ‘फ्री कसोल कॅफे’ हे कोणतेही पंचतारांकित हॉटेल नसून खरेतर रस्त्यालगत असलेला सामान्य, लहानसा कॅफे आहे. हा कॅफे अस्तित्वात येऊन तसा फार जास्त काळ लोटला नसला, तरी एका आगळ्याच कारणामुळे हा लहानसा कॅफे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. एका दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार या कॅफेमध्ये गेलेल्या एका भारतीय तरुणीला तिथल्या व्यवस्थापकाने मेन्यू कार्ड देण्यास नकार दिला. त्या भारतीय तरुणीला तिथे चहापान करता येणार नाही असेच त्याला सुचवायचे असल्याचे या तरुणीचे म्हणणे होते. अश्या घटना या कॅफेमध्ये वारंवार घडत असून, येथे भारतीय ग्राहकांना येऊ दिले जात नसल्याचे वृत्त दैनिकाने प्रसिद्ध केले होते.

तमिळनाडू राज्यातील तिरूनेलवेली जिल्ह्यामध्ये असलेल्या कुंदनकुलम या शहरामध्ये न्युक्लियर पावर प्लांट आहे. या पावर प्लांटमध्ये काम करणारे कर्मचारी रशियन नागरिक असून, त्यांची स्वतंत्र कॉलनी या पावर प्लांटच्या परिसरामध्ये आहे. ही कॉलनी सर्व सुविधांनी परिपूर्ण असून, येथे रशियन नागरिकांसाठी राहण्यास घरे, रेस्टॉरंट्स, क्लब हाऊसेस, इत्यादी सर्व सोयी आहेत. या कॉलनीमध्ये भारतीयांना मात्र प्रवेश नाही. चेन्नईमध्ये मंडवेली परिसरामध्ये असलेले ‘रेड लॉलीपॉप होस्टेल’ हे केवळ परदेशातून आलेल्या पर्यटकांसाठी असून, या ठिकाणी परदेशी पासपोर्ट धरकांनाच राहण्याची परवानगी आहे. पर्यटकांमध्ये लोकप्रिय असलेल्या गोव्यामध्ये देखील अनेक बीच केवळ परदेशी पाहुण्यांच्या करिता राखीव असून, या बीचेसवर जाण्याची परवानगी भारतीयांना नाही. केवळ परदेशी पाहुण्यांसाठी राखीव असलेले बीचेस पुदुच्चेरी येथेही आहेत.

चेन्नई येथे असलेल्या ब्रॉडलँड्स हॉटेलमध्ये ही स्थानिक भारतीय नागरिकांना जाण्यास परवानगी नसून, अनिवासी भारतीय लोकांनाच या हॉटेलमध्ये प्रवेश आहे. धरमशाला येथे असलेल्या नोर्बुलिंगका कॅफेमध्येही भारतीय पर्यटकांना प्रवेश नाही, त्याचप्रमाणे चीन व्याप्त अरुणाचल प्रदेश राज्याच्या अनेक भागांमध्ये भारतीयांना प्रवेश नाही. हे भाग चीन देशाच्या आखत्यारीत येत असल्याचे म्हटले जात असल्याने या ठिकाणी भारतीयांना प्रवेश नाही.

Leave a Comment