अश्या प्रकारे समजून घ्या समोरच्या व्यक्तीची ‘बॉडी लँँग्वेज’


आपल्या समोरची व्यक्ती तोंडाने काही बोलत असली, तरी त्या व्यक्तीच्या शारीरिक हालचालींवरून त्या व्यक्तीच्या मनामध्ये नेमके काय विचार सुरु आहेत याचा अंदाज आपण बांधू शकतो. उदाहरणच द्यायचे झाले, तर मुलाखत देण्यासाठी आलेल्या एखाद्या व्यक्तीचे देता येईल. वरून या व्यक्ती कितीही आत्मविश्वासाने परिपूर्ण वाटत असल्या, तरी सतत हाताची घडी घालणे, सोडणे, बसल्या बसल्या पायांची सातत्याने हालचाल, त्या व्यक्तीच्या मनामधली चिंता दर्शवित असते. अश्या प्रकारे एखाद्या व्यक्तीच्या अगदी लहानसहान शारीरिक हालचालींवरूनही त्या व्यक्तीच्या मनातील नेमके भाव आपल्या ध्यानी येऊ शकतात. यालाच एखाद्याची ‘बॉडी लँग्वेज’ समजून घेणे असे म्हटले जाते. त्यामुळे काही प्रकारच्या विशिष्ट शारीरिक हालचालींचे अर्थ काय असू शकतात हे जर जाणून घेतले, तर एखाद्याच्या बॉडी लँग्वेजवरून त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय विचार चालले आहेत हे ओळखता येण्याची कला साध्य होऊ शकते.

‘युक्ला’च्या वैज्ञानिकांनी केलेल्या अध्ययनाच्या अनुसार प्रत्येक व्यक्ती कळत नकळत समोरच्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजचा अर्थ लावीत त्यानुसार आपण कशी प्रतिक्रिया द्यावी याचा विचार करीत असते. किंबहुना आपल्या संभाषणामध्ये सुमारे सात टक्के संभाषण आपल्या भाषेवर, अडतीस टक्के संभाषण आपण एखादी गोष्ट कश्या प्रकारे बोलून दाखवतो त्यावर, आणि उर्वरित पंचावन्न टक्के आपल्या बॉडी लँग्वेजवर अवलंबून असल्याचे या अध्ययनामध्ये म्हटले आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीशी संभाषण करीत असताना त्या व्यक्तीच्या बॉडी लँग्वेजकडे बारकाईने लक्ष द्या. त्याद्वारे त्या व्यक्तीने प्रत्यक्षात फारसे काही बोलून न दाखवता देखील त्या व्यक्तीच्या मनामधील नेमके विचार समजून घेण्याचा प्रयत्न करता येऊ शकतो.

एखादी व्यक्ती आपल्या समोर बसली असताना ती व्यक्ती सतत हातांची घडी घालत असेल, तर त्या व्यक्तीला तुमचे म्हणणे पटत नसल्याची ती खूण आहे. मानसशास्त्रज्ञांच्या अनुसार सतत हातांची घडी घालून बसणाऱ्या व्यक्ती इतर व्यक्तींच्या विचारांना, किंवा मतांना ‘ब्लॉक’ करीत असतात. विशेष गोष्ट अशी, की आपण सतत हातांची घडी घालतो हे त्या व्यक्तीच्या लक्षात येतेच असे नाही, पण ही लहानशी खूणही त्या व्यक्तीच्या मनामध्ये असलेली इतरांच्या बद्दलची साशंकता दर्शविते. एखाद्या व्यक्तीला येणारे हसूही त्या व्यक्तीच्या मनातील भावना दर्शवित असते. मनापासून आलेले हसू चेहऱ्यावरच नाही, तर डोळ्यांवरूनही लक्षात येते. एखादी व्यक्ती मनापासून हसत असेल, तर त्या व्यक्तीचे डोळे बारीक होतात, असे मानसशास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. त्यामुळे समोरची व्यक्ती हसत असताना त्या व्यक्तीचे हसू मनापासून आहे किंवा नाही, हे त्या व्यक्तीचे डोळे अधिक स्पष्टपणे सांगू शकत असल्याचे म्हटले जाते.

एखाद्या व्यक्तीशी संभाषण करताना ती व्यक्ती आपल्या नजरेला नजर देऊन बोलत असली, तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये खोटेपणाची भावना नाही, हे समजून घेता येते, तर एखादी व्यक्ती सतत नजर चोरत बोलत असली, किंवा आपल्याशी बोलत असताना जर ती व्यक्ती आपल्याकडे पाहणे टाळत असली, तर बहुतेकवेळी या व्यक्ती काही तरी लपवित असल्याची किंवा खोटे बोलत असल्याची ही खूण आहे. त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती अधिकच नजर रोखून बोलत असली, तरीही ती व्यक्ती संपूर्ण सत्य बोलत नसल्याची शक्यता असल्याचेही मानसशास्त्रज्ञ म्हणतात. एखाद्या व्यक्तीशी बोलत असताना सात ते दहा सेंकदांचा ‘आय कॉन्टॅक्ट’ योग्य समजला जातो. आपण बोलत असताना समोरच्या व्यक्तीच्या उंचाविलेल्या भुवया, त्या व्यक्तीची अस्वस्थता दर्शवित असतात. तसेच संभाषणाच्या दरम्यान समोरची व्यक्ती सतत जोरजोराने मान डोलवित असेल, तर ती व्यक्ती आपल्या मताशी सहमती दर्शविण्याचा अधिकच प्रयत्न करीत असल्याची खूण असते. आपल्या विषयी समोरची व्यक्ती काय विचार करीत असेल, आपल्याबद्दलचे मत कसे असेल याचा विचार या व्यक्ती करीत असल्याने समोरच्या व्यक्तीला खुश करण्यासाठी वारंवार जोरजोराने मान हलवून प्रत्येक मताशी सहमती दर्शविण्याचा प्रयत्न या व्यक्ती करीत असतात.

काही व्यक्ती संभाषणाच्या दरम्यान आपला जबडा आवळून घेतात. अश्या वेळी त्यांच्या भुवयाही आकुंचन पावत असतात. या हालचालींमधून संभाषणाबद्दलची अस्वस्थता, राग, भीती, काळजी किंवा नापसंती प्रदर्शित होत असते. एखाद्या विषयाचे संभाषण टाळण्याकडे कल असल्यासही याचप्रकारच्या हालचाली पहावयास मिळतात. त्यामुळे व्यक्ती तोंडाने काहीही बोलत असली, तरी या हालचालींवरून त्या व्यक्तीच्या मनातील नेमके भाव ओळखून आपली प्रतिक्रिया ठरविता येऊ शकते.

Leave a Comment