ऑस्ट्रियामध्ये या ठिकाणी कैद्यांसाठी आहे पंचतारांकित कारागृह


पर्यटकांना राहण्यासाठी पंचतारांकित हॉटेल्समध्ये मिळणाऱ्या सुविधांबद्दल आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र कैद्यांना राहण्यासाठी पंचतारांकित कारागृहाची कल्पना आपण कधी केली आहे का? कैद्यांना पंचतारांकित हॉटेल प्रमाणे सुविधा देणारे कारागृह ऑस्ट्रिया देशामध्ये अस्तित्वात असून, या ठिकाणी बंदिवासामध्ये असणाऱ्या कैद्यांना अगदी राजेशाही सुखसोयी पुरविण्यात येतात.

ऑस्ट्रियाच्या निसर्गरम्य पर्वतराजीच्या कुशीत लेओबेन नामक एक लहानसे शहर वसलेले आहे. या शहरामध्ये ‘जस्टीस सेंटर लेओबेन’ हे कारागृह आहे. वास्तविक ही अलिशान इमारत न्यायालयाची असून, याच ठिकाणी कैद्यांसाठी कोठड्या देखील बनविण्यात आल्या आहेत. या इमारतीचे निर्माण २००५ साली करण्यात आले असून, सुप्रसिद्ध वास्तुकार जोसेफ होहेनसिन्न यांनी ही इमारत डिझाईन केली आहे. सर्व प्रकारच्या सुखसोयी असणाऱ्या या आलिशान कारागृहामध्ये २०५ कैद्यांसाठी राहण्याची व्यवस्था आहे. सर्वसामान्य घरांमध्ये असतात त्या सर्व सुखसुविधा या कारागृहामध्ये कैद्यांना देण्यात येत असतात. त्या शिवाय कैद्यांसाठी येथे स्पा, व्यायामशाळा, आणि स्पोर्ट्स क्लबचीही व्यवस्था आहे.

हे कारागृह सर्वसामान्य कारागृहांच्या मानाने खूपच वेगळे आहे. या कारागृहामध्ये प्रत्येक कैद्यासाठी स्वतंत्र निवासी युनिटची व्यवस्था असून, प्रत्येक युनिटमध्ये स्वतंत्र बैठकीची खोली, किचन आणि बाथरूमची व्यवस्था आहे. या शिवाय प्रत्येक निवासी युनिटमध्ये कैद्यांच्या मनोरंजनासाठी टीव्ही देखील उपलब्ध आहे. कारागृहाच्या इमारतीचा एक भाग न्यायालयाच्या कामकाजासाठी वापरला जात असल्याने येथे सामान्य जनतेचे येणेजाणे होत असते. इमारतीच्या या भागातून कैद्यांसाठी बनविण्यात आलेले पंचतारांकित कारागृह पाहण्यासाठी अनेक पर्यटक आणि हौशी मंडळी आवर्जून येथे येत असतात.

Leave a Comment