डोळ्यांभोवती असलेली काळी वर्तुळे नाहीशी करण्यासाठी खोबरेल तेलाचा असा करा वापर


आपला चेहरा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबद्दल बरेच काही सांगत असतो. नितळ आणि ताजातवाना चेहरा व्यक्तीच्या उत्तम शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे प्रतीक असतो, तर सतत ओढलेला चेहरा, चेहऱ्यावर अकाली आलेल्या सुरकुत्या, डोळ्यांच्या भोवती दिसत असलेली काळी वर्तुळे, तणाव दर्शवित असतात. सतत जागरणे, मानसिक तणाव, शारीरिक थकवा यांमुळे डोळ्यांच्या भोवती काळी वर्तुळे दिसू लागतात. अश्या प्रकारच्या वर्तुळांमुळे व्यक्तीचा चेहरा सतत तणावग्रस्त आणि त्याचबरोबर अनाकर्षक दिसू लागतो. डोळ्याच्या भोवतीची काळी वर्तुळे दिसू नयेत यासाठी अनेक लोक प्रसाधनांचा वापर करीत असले, तरी हा काही कायमस्वरूपी उपाय नाही. ही वर्तुळे कायमस्वरूपी नाहीशी करण्यासाठी सर्वप्रथम आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून आपल्याला पुरेशी विश्रांती, झोप मिळत असल्याचे पाहणे आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्याही गोष्टीमुळे मनावर आलेला तणाव कसा कमी करता येईल हे पाहणेही गरजेचे आहे. ही वर्तुळे नाहीशी करण्यासाठी चेहऱ्यावर संपूर्ण नैसर्गिक प्रसाधनेही वापरता येतील. असेच एक प्रसाधन म्हणजे खोबरेल तेल.

काळी वर्तुळे नाहीशी करण्यसाठी खोबरेल तेलाचा वापर अतिशय सुरक्षित आहे. या तेलामध्ये असलेले स्निध पदार्थ त्वचेला आर्द्रता प्रदान करून पोषण देणारे आहेत. अनेकदा डोळ्यांच्या भोवतीची त्वचा कोरडी पडून काळी वर्तुळे निर्माण होत असतात. खोबरेल तेलाच्या वापराने हा कोरडेपणा नाहीसा होऊन काळी वर्तुळे हे नाहीशी होण्यास मदत होते. खोबरेल तेलामध्ये असलेले कॅप्रिक अॅसिड, कॅप्रीलिक अॅसिड आणि मायरिस्टिक अॅसिड ही अँटी ऑक्सिडंट्सनी परिपूर्ण असून, त्वचेला पोषण देणारी आहेत. या तेलामध्ये त्वचेसाठी उत्तम समजले जाणारे इ जीवनसत्वही मुबलक मात्रेमध्ये आहे. डोळ्यांच्या भोवती असलेली काळी वर्तुळे नाहीशी करण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर निरनिराळ्या प्रकारे करता येईल.

हायड्रॉलिक प्रेसच्या मदतीने काढले गेलेले खोबरेल तेल रसायनमिश्रित नसून, सर्वात शुद्ध समजले जाते. यालाच ‘कोल्ड प्रेस्ड ऑइल’ म्हटले जाते. हे तेल बाजारामध्ये सहज उपलब्ध असून, या तेलाने डोळ्यांच्या भोवती दररोज हलक्या हाताने मालिश केल्यास काहीच दिवसांमध्ये काळी वर्तुळे नाहीशी होऊ लागतात. या तेलाने मालिश करण्यापूर्वी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. त्यानंतर या तेलाने डोळ्यांच्या भोवती हलक्या हाताने मालिश करून हे तेल रात्रभर डोळ्यांच्या भोवती राहू द्यावे. सकाळी उठल्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. या शिवाय खोबरेल तेल आणि हळदीच्या मिश्रणानेही डोळ्याच्या भोवती असलेली काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. कच्ची हळद आणून त्याची पेस्ट करावी. या पेस्टमध्ये खोबरेल तेल घालून ही पेस्ट डोळ्यांच्या भोवती लावावी. पेस्ट लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुतलेला असावा. ही पेस्ट डोळ्यांच्या भोवती लावून पंधरा मिनिटे राहू द्यावी. नंतर ओल्या कापसाने किंवा स्वच्छ, मऊ कपडा ओला करून घेऊन त्याने ही पेस्ट पुसून काढावी. हा उपाय दररोज करावा.

खोबरेल तेल आणि बदामाचे तेल समप्रमाणात घेऊन ते एकत्र करावे आणि या तेलाचा वापर करून डोळ्यांच्या भोवती हलक्या हाताने मालिश करावी. हे तेल रात्रभर चेहऱ्यावर राहू द्यावे आणि सकाळी उठल्यावर चेहरा स्वच्छ धुवावा. त्याचप्रमाणे खोबरेल तेलामध्ये थोडेसे बेसन, लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि मध घालून हे मिश्रण चांगले एकत्र करावे. चेहरा स्वच्छ धुवून घेऊन त्यानंतर ही पेस्ट डोळ्यांच्या भोवती लावावी आणि हलक्या हाताने काही मिनिटे मालिश करावी. त्यानंतर चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करावा. या शिवाय कोरफडीच्या गराने नियमित मालिश केल्यासही डोळ्यांच्या भोवतीची काळी वर्तुळे नाहीशी होतात. खोबरेल तेलामध्ये इतर पदार्थ मिसळून या मिश्रणाने डोळ्यांच्या भोवती मालिश करीत असताना ही मिश्रणे किंवा पेस्ट्स डोळ्यांमध्ये जाणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment