अशी करा ‘जैविक’ अन्नपदार्थांची पारख


आजकालचा जमाना हा ‘हेल्दी इटिंग’चा झाला असून, त्यामध्ये प्रामुख्याने ‘organic’ खाद्यपदार्थ विशेष लोकप्रिय होताना पहावयास मिळत आहेत. फळे, भाज्या, मध आणि तत्सम खाद्यपदार्थ, इथपासून डाळी, कडधान्ये, मसाल्याचे पदार्थ आणि अगदी अंड्यांसारखे पदार्थ ही organic असण्यावर अधिक भर दिला जात आहे. हे जैविक पदार्थ किंमतीला जास्त असले, तरी रसायनविरहित आणि अधिक शुद्ध आहेत असे मानून खरेदी केले जातात. पण अश्या वेळी अन्नपदार्थांमध्ये होणारी भेसळ भारतामध्ये सामान्य बाब असताना आपण जैविक म्हणून जास्त किंमत मोजून खरेदी करून आणत असलेले खाद्यपदार्थ खरोखरच जैविक आहेत का, आणि त्याची पडताळणी कशी करून पहायची या विचार करण्याजोगा मुद्दा आहे.

याच प्रश्नावर चेन्नईमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीने तोडगा शोधून काढला असून, तिने विकसित केलेल्या काही सोप्या चाचण्यांच्या माध्यमातून, आपण जैविक म्हणून खरेदी करीत असलेले अन्नपदार्थ खरोखरीच जैविक आहेत, की त्यावर केवळ ‘organic’चा ‘टॅग’ लावलेला आहे याची पडताळणी करून पाहणे शक्य होणार आहे. हेमलता राजेन्द्रन नामक विद्यार्थिनीने या चाचण्या विकसित केल्या असून या चाचण्यांच्या मार्फत आपण खरेदी करीत असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये युरिया, कीटकनाशके, किंवा इतर घातक पदार्थ तर नाहीत ना, याची खातरजमा करून घेणे शक्य होणार आहे. या चाचण्यांसाठी हेमलताने एक किट विकसित केली असून त्यामध्ये ए-4 कागदाच्या स्ट्रिप्स आहेत. या स्ट्रिप्सचा वापर ‘लिटमस पेपर’ प्रमाणे करता येणार असून अन्नपदार्थ जैविक नसल्यास या स्ट्रिप्सचा रंग बदलून त्या पदार्थामध्ये रसायने किंवा तत्सम घटक असल्याचे निदान केले जाऊ शकते. या स्ट्रिप्स एका विशिष्ट ‘रीएजंट’मध्ये बुडविल्या गेल्या असून, खाद्यपदार्थांमध्ये युरिया सारखी रसायने किंवा कीटकनाशके असल्यास या स्ट्रिप्सचा रंग त्वरित बदलतो.

सध्या या स्ट्रिप्सची किट प्रायोगिक पातळीवर तयार करण्यात आली असून, या स्ट्रिप्स दहा दिवस ‘अॅक्टिव्ह’ राहतात. एका पॅकेटमध्ये दहा स्ट्रिप्स असून, एका पॅकेटची किंमत अवघी पाच रुपये असणार आहे. या स्ट्रिप्सचा वापर करण्यासाठी कोणत्याही तांत्रिक बाबींचे किंवा रसायनांचे ज्ञान असणे गरजेचे नसून, सर्वसामान्य माणसाला देखील ही टेस्ट किट वापरून आपण खरेदी करीत असलेले अन्नपदार्थ organic आहेत किंवा नाही याची पडताळणी करून पाहणे शक्य होणार आहे. उदाहरणार्थ दुध organic आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी ही स्ट्रिप दुधामध्ये बुडविली असता, मूळची हलक्या पिवळसर रंगाची ही स्ट्रिप, दुधामध्ये युरिया अथवा कीटकनाशाकांची भेसळ असता त्वरित गडद पिवळ्या रंगाची होते. तसेच भाज्या आणि फळे organic आहेत किंवा नाही हे पाहण्यासाठी या स्ट्रिप भाज्या वा फळांवर ठेवल्या असता त्यांवर कीटकनाशके किंवा तत्सम रसायने वापरली गेली असल्यास, यांचा रंग बदलून गडद निळा होतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment