वामकुक्षी – उतम आरोग्यासाठी आणि मनावरील तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त


ज्याप्रमाणे उत्तम आरोग्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आवश्यक आहे, त्याचप्रमाणे नियमित आणि पुरेशी झोप देखील उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असते. झोपेच्या रूपामध्ये मेंदूला मिळणाऱ्या विश्रांतीमुळे मेंदू अधिक सक्रीय होतो. त्यामुळे मेंदूची कार्यशक्ती सुधारून स्मरणशक्ती अधिक तल्लख होण्यास मदत होते. पुरेश्या विश्रांतीने शरीराचा थकवा आणि मनावरील तणाव कमी होण्यास मदत होत असून, शरीरामध्ये उत्साह संचारतो, बुद्धी सचेत रहाते, शरीराचे तापमान आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो. या दृष्टीने दुपारची वामकुक्षी अतिशय महत्वाची असल्याचे आता वैज्ञानिक संशोधनाच्या द्वारे सिद्ध झाले आहे.

नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या वतीने सादर करण्यात आलेल्या अध्ययनाच्या अनुसार वामकुक्षी तीन प्रकारांमध्ये विभागली जाऊ शकते. यामध्ये ‘प्रेपरेटरी नॅप्स’, ‘इमर्जन्सी नॅप्स’ आणि ‘हॅबिचुअल नॅप्स’ हे तीन प्रकार समाविष्ट आहेत. अतिशय झोप येण्यापूर्वी थोड्या वेळासाठी घेतलेली वामकुक्षी ‘प्रेपरेटरी नॅप’ म्हणून ओळखली जाते, तर कधी काम करीत असताना अतिशय थकल्यामुळे, काम करत राहणे अशक्य होऊन बसते. अश्यावेळी आधीपासून न ठरविता घेतलेली वामकुक्षी ‘इमर्जन्सी’ या प्रकारात मोडते. दिवसभराच्या कामामधून काही वेळ बाजूला ठेवत दररोज नियमित घेतली जाणारी वामकुक्षी ‘हॅबिचुअल’ म्हटली जाते. अश्या प्रकारची वामकुक्षीची सवय लहान मुलांमध्ये आणि मोठ्या माणसांमध्येही, विशेषतः वयस्क मंडळींमध्ये सामान्यपणे पाहिली जाते.

ज्याप्रमाणे वामकुक्षीची सवय भारतामध्ये सामान्य आहे, त्याचप्रमाणे जगामध्ये अनेक देशांमध्येदेखील वामकुक्षीचा प्रघात सर्वमान्य आहे. स्पेनमध्ये ही वामकुक्षी ‘सियेस्ता’ या नावाने ओळखली जाते, तर अमेरिका आणि इंग्लंडमध्ये मात्र वामकुक्षीची पद्धत नाही. वैज्ञानिकांच्या अनुसार म्हणूनच या देशांमध्ये मानसिक नैराश्याच्या आहारी गेलेल्या व्यक्तींचे प्रमाण अधिक असून, या देशांमध्ये उच्चरक्तदाब, हृदयरोगासारख्या विकारांचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे वामकुक्षी उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे म्हटले जाते. वामकुक्षी घेणे महत्वाचे आहेच, पण ही वामकुक्षी किती वेळासाठी घेतली जाते यावरही त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे अवलंबून असतात.

वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार दररोज वीस मिनिटे घेतलेली वामकुक्षी मेंदू सक्रीय ठेवण्यासाठी, आणि स्मरणशक्ती तल्लख करण्याच्या कामी उपयुक्त आहे. वीस ते तीस मिनिटे घेतलेली वामकुक्षी क्रियाशीलता वाढविण्यासाठी सहायक असते. तीस मिनिटे ते एक तास घेतलेली वामकुक्षी उत्तम निर्णयक्षमता प्रदान करणारी असते, तर एक ते दीड तासांसाठी घेतलेली वामकुक्षी संपूर्णपणे शरीराचा थकवा घालविणारी आणि मेंदू पूर्णपणे ‘रीचार्ज’ करणारी असते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment