महाराष्ट्र पोलीस दल हे सर्वोत्तम – दिलीप वळसे पाटील यांचे गौरवोद्गार


पुणे : सन १९६० पासून ते आजतागायत संप्रेषण क्षेत्रात विविध बदल झालेले आहेत. त्यानुसार राज्याचे पोलीस दल नेहमी तत्पर, कार्यक्षम, अचूक निर्णयक्षम म्हणून सर्वत्र परिचित आहेत. त्यामुळे राज्याच्या पोलीस दलाप्रती देशातील पोलीस दलाला नेहमी आदर वाटतो, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे गौरवोद्गार गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काढले.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण व परिवहन कार्यालयाच्या आयोजित विविध प्रकल्पाचे उद्घाटन करुन आढावा घेण्यात आला. त्यावेळी अपर पोलीस महासंचालक व संचालक रितेश कुमार, कारागृह व सुधारसेवा अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक सुनील रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी राज्य बिनतारी संदेश विभागात प्रशिक्षणार्थी क्षमतावाढी बाबत प्रस्ताव सादर करण्याबाबत सूचना देत त्याचा पाठपुरावा करुन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. पोलिस कल्याण निधीच्या माध्यमातून पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी सांगितले.

गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्याहस्ते पोलीस परेड ग्राऊंड, पोलीस बिनतारी संदेश मुख्यालय परिसरातील 6 इमारती ११२.८४KW क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प,प्रतिवर्षी ३ कोटी लीटर पाणी साठा करण्याची क्षमता असलेला पर्जन्यजल पुनर्भरण (R WH) प्रकल्प, तसेच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इनोव्हेशन केंद्राचे उदघाटन करण्यात आले. गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी पोलीस बिनतारी संदेश संग्रहालय, सर जे.सी. बोस ई-लर्निंग केंद्राची पाहणी केली.