जो बायडन यांची फेसबुकवर आगपाखड; सोशल मीडियावरील खोट्या माहितीमुळे होत आहे लोकांचा मृत्यू


वॉशिंग्टन – सोशल नेटवर्कींग कंपन्यांमुळे माणसे मरत असल्याचे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी केले आहे. अनेकजण सोशल नेटवर्किंग साइटवरील खोट्या माहितीला बळी पडतात आणि त्यात त्यांचा प्राण जातो, असे बायडन कोरोना लसीकरणासंदर्भातील आपल्या भाषणात म्हणाल्याचे वृत्त एएफपीने दिले आहे.

खोटी माहिती ही लसीकरण मोहिमेसाठी घातक ठरु शकते, असे मत अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर विवेक मूर्ती यांनी व्यक्त केल्यानंतर बायडन यांनी हे वक्तव्य केले आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला खोट्या माहितीमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो. अमेरिकेतील नागरिकांमध्ये विषाणूचा मोठ्याप्रमाणात होणारा प्रादुर्भाव आणि त्यांचे गंभीर परिणाम हे केवळ लसीकरणाच्या माध्यमातून टाळता येऊ शकतात, असे मत मूर्ती यांनी व्यक्त केले होते.

बायडन यांना पत्रकारांनी एका पत्रकार परिषदेदरम्यान याचसंदर्भात प्रश्न विचारला. खोटी माहिती पसरवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्ससाठी तुमचा काही संदेश आहे का?, असे बायडन यांना पत्रकारांनी विचारले. बायडन यांनी त्यावर उत्तर देताना, ते लोकांना मारत असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली. सध्या आपल्याकडे केवळ लसीकरण न झालेल्यांना साथीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याचेही बायडन म्हणाले.

मूर्ती यांनी गुरुवारी बोलताना कोरोनासंदर्भातील चुकीची माहिती ही इम्फोडॅमिक म्हणजेच चुकीच्या माहितीची साथ असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचा संदर्भ देत सांगितले. हा इम्फोडॅमिक धोकादायक असल्याचे मूर्ती म्हणाले. मूर्ती हे अमेरिकेच्या कोरोना टास्क फोर्सचे सदस्य आहेत. आपल्या देशातील आरोग्य व्यवस्थेला चुकीच्या माहितीमुळे मोठा आणि गंभीर धोका असल्याचे मूर्ती म्हणाले. अनेकांचे जीव माहितीवर अवलंबून असतात. त्यामुळे एक देश म्हणून आपण चुकीच्या माहितीविरोधात एकत्र आले पाहिजे, असेही मूर्ती यांनी स्पष्ट केले. खोटी, चुकीची माहिती पसरवण्यामध्ये तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल बोलताना मूर्ती यांनी कंपन्यांनी, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसने त्यांच्या प्रोडक्टमध्ये आवश्यक ते बदल करुन चुकीच्या माहितीचा प्रसार होणार नाही आणि योग्य माहितीची लोकांपर्यंत पोहचेल याची काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा मूर्तींनी व्यक्त केली.

हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म अनेकदा चुकीची माहिती जास्त लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी फायदेशीर ठरतील अशापद्धतीने डिझाइन केलेले असतात. आता कंपन्यांना आम्ही यासंदर्भात उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. आम्ही कंपन्या स्वत:हून काही करतील यासाठी वाट पाहत बसणार नाही, असेही मूर्ती म्हणाले. बायडन यांच्या वक्तव्यानंतर फेसबुकने आरोप फेटाळून लावत आम्ही लोकांना वाचवण्यासाठी मदत करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

यावर फेसबुकचे प्रवक्ते दानी लिवर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणतेही पुरावे नसताना आमच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमुळे आम्ही विचलित होणार नाही. खर तर हे आहे की दोन बिलियनहून अधिक लोकांनी कोरोनासंदर्भातील आणि लसीकरणाबद्दलची योग्य माहिती आमच्या माध्यमातून पाहिली आहे. इंटरनेटवर इतर कोणत्याही माध्यमावर एवढ्या लोकांनी ही माहिती पाहिली नसल्याचे लिवर म्हणाले. जगभरामध्ये कोरोनाचा फैलाव होत असताना आम्ही जास्तीत जास्त योग्य माहिती लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ट्विटरनेही म्हटले आहे.