आगामी 100 ते 125 दिवस अत्यंत महत्वपूर्ण; केंद्र सरकारचा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर इशारा


नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेली परिस्थिती आता नियंत्रणात आहे, पण आगामी काळात आपण कोरोनाच्या नियमांचे पालन केले नाही, तर परिस्थिती पुन्हा बिघडू शकते. त्यामुळे येणारे 100 ते 125 दिवस अत्यंत महत्वपूर्ण असल्याचा इशारा केंद्र सरकारने दिला आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्राने प्रशासनाला आणि नागरिकांना हा इशारा दिला आहे.

याबाबत निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, कोरोनाच्या संकटाचे भारतातील मोठ्या लोकसंख्येवर अजूनही सावट आहे. हर्ड इम्युनिटी लेव्हलपर्यंत ही लोकसंख्या अद्याप पोहोचलेली नसल्यामुळे धोका अद्याप टळलेला नाही. लसीकरणाची गती वाढवल्यास आपण सुरक्षित होऊ शकतो. त्यामुळेच येणारे 100 ते 125 दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. या काळात आपण कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल यांनी पुढे सांगितले की, उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांत कोरोनाची स्थिती चिंताजनक होत असल्यामुळेच संपूर्ण जगभरात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता जास्त आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही तशा प्रकारची चिंता व्यक्त करुन सर्व देशांना उपाययोजना करण्यास सांगितले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीकरण झाल्यामुळे 95 टक्के मृत्यू कमी झाल्याचे डॉ. व्हीके पॉल यांनी सांगितले. ते म्हणाले की, जर आपण ठरवले तर देशात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकणार नाही. लसीकरणाचा वेग वाढवला आणि येत्या तीन ते चार महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यास आपण कोरोनाच्या संभाव्य धोक्यापासून बचाव करु शकतो.