आदिवासी बांधवांनी अंधश्रद्धा न बाळगता लसीकरणास प्राधान्य द्यावे; छगन भुजबळ


नाशिक : कोरोनाचा वाढता प्रसार पाहता आदिवासी बांधवांनी लसीकरणाबाबत अंधश्रद्धा न बाळगता लसीकरणाला प्राधान्य द्यावे. तसेच खावटी योजनेचा लाभ तळागाळातील प्रत्येक लाभार्थ्याला मिळण्यासाठी संबंधित यंत्रणेने नियोजन करावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.

येवला येथील शासकीय विश्रामगृह येथे खावटी योजनेंतर्गत आदिवासी पात्र लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप पालकमंत्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना, सहाय्यक प्रकल्प अधिकारी गुजर, शिक्षण विस्तार अधिकारी संजय कापडणीस, नगरसूल आश्रम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, आदिवासी बांधवांनी लसीकरणाबाबत असणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेळेत रोखण्यासाठी कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तात्काळ दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत, असे आवाहनही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी केले आहे.

नाशिक जिल्ह्यात 61 हजार खावटी किटचे वाटप करण्यात येणार असून येवला तालुक्यात 3 हजार 265 किटचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच या योजनेतून लाभार्थ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा करण्यात आले असून दोन हजार रुपयांच्या जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात येत आहे, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.