हा होता जगातला पहिला वॅक्सिन पासपोर्ट

करोना महामारी मुळे आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी जगभरातील देश वॅक्सिन पासपोर्टची तयारी करत आहेत. हा पासपोर्ट म्हणजे करोना साठीचे लसीकरण पूर्ण झाल्याचा पुरावा मानला जाणार आहे. मात्र वॅक्सिन पासपोर्ट ही कल्पना नवी नाही. २० व्या शतकात अशी प्रथा चलनात आली ती अमेरिकेत देवी या साथीचा उद्रेक झाला होता तेव्हा. त्यावेळी सुद्धा देवी पासून बचाव व्हावा म्हणून दंडावर, हातावर देवी काढल्या जात. अमेरिकेत त्याकाळी केवळ बाहेरगावीच नाही तर दररोज कामासाठी बाहेर पडण्याऱ्या व्यक्तीला सुद्धा दंडावर देवीची लस घेतल्याचा व्रण दाखवावा लागत होता. त्यावेळी ‘शो ए स्कार’ असा हुकुम पोलीस व अन्य संबंधित कुणाही व्यक्तीला करू शकत होते.

त्यावेळी जगात देवीच्या साथीमुळे अनेकांना जीवाला मुकावे लागत असे. जे यातून बरे होतील त्यांना अंधत्व येण्याचे प्रमाण मोठे होते तसेच अनेकांना त्यानंतर गंभीर आजार होत असत. १८९९ ते १९०४ या काळात एकट्या अमेरिकेत देवी मुळे १,६४,२८३ मृत्यू झाल्याचा सरकारी अधिकृत आकडा आहे. प्रत्यक्षात तो याहून मोठा असण्याची शक्यता आहे.

त्यावेळी सुद्धा देवी पासून बचाव व्हावा यासाठी अनेक उपाय अवलंबिले जात होते. त्यातील एक आत्ताच्या वॅक्सिन पासपोर्टशी मिळताजुळता होता पण तो कागदावर नसे तर दंडावर, हातावर लस घेतल्याची खूण हा असे. दंडावरची ही खूण जगातला पहिला वॅक्सिन पासपोर्ट म्हणता येतो. सार्वजनिक ठिकाणी जाताना ही खूण हवीच असे त्याकाळी बंधन होते. जागोजागी अधिकारी प्रत्येक एन्ट्री सेंटरवर त्याची तपासणी करत असत. देवी येऊन गेलेल्या व्यक्तीला त्याची गरज नसे कारण त्याच्या अंगावर, तोंडावर देवीचे व्रण दिसत असत.

या संदर्भातील उल्लेख १९१० च्या अलपासो वर्तमानपत्रात असल्याचे सीएन ट्रॅव्हलरच्या वेबसाईटवर आहे. ही लस घेणे अतिशय वेदनादायक होते. त्यात त्वचेवर एक चीर करून त्यातून देवीचे जिवंत जंतू शरीरात घातले जात. त्यानंतर ताप येणे, अंगदुखी होई आणि दंडावर एक कायमचा व्रण उठे. त्यातही लोक चलाखी करत असत. लस नको म्हणून अनेक जण नायट्रिक अॅसीडच्या सहाय्याने दंडावर व्रण करून घेत असत.