करोनाने देशात २३० वेळा बदलले रूप, सापडले डेल्टाचे तिसरे व्हेरीयंट

करोना जीनोम सिक्वेन्सिंग मधून अत्यंत महत्वाची माहिती वैज्ञानिकांनी मिळविली असून देशात आत्तापर्यंत करोनाने २३० वेळा त्याचे रूप बदलले असल्याचे यात समोर आले आहे. अर्थात ही सर्व म्युटेशन माणसासाठी हानिकारक नाहीत मात्र त्यातील काही गंभीर म्युटेशन मुळे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गंभीर म्युटेशनपैकी एक डेल्टा व्हेरीयंट देशविदेशात वेगाने फैलावले आहे. यापूर्वी डेल्टा आणि डेल्टा प्लस अशी दोन व्हेरीयंट मिळाली होती त्यात भर पडून आता डेल्टाचे तीसरे व्हेरीयंट आढळले आहे. त्याला एवाय ३ असे नाव दिले गेले आहे. डेल्टाचे एवाय ३ म्युटेशन मिळालेला भारत, हा अमेरिकेनंतरचा दुसरा देश आहे.

जीनोम सिक्वेन्सिंगवर लक्ष ठेवणाऱ्या इसाकोग सिस्टीमने राज्यांना अॅलर्ट दिला असून करोनाच्या नव्या व्हेरीयंट वर वैज्ञानिक लक्ष ठेऊन आहेत. नव्या व्हेरीयंट संदर्भात अजून पूर्ण माहिती मिळालेली नाही. पण हा व्हेरीयंट गंभीर श्रेणीत असू शकेल असा अंदाज आहे. देशात ४३.८० कोटी पेक्षा अधिक सँपल्सची तपासणी झाली असली तरी त्यापैकी ४२८६९ सँप्लसचे जीनोम सिक्वेन्सिंग होऊ शकले आहे. यातच २३० व्हेरीयंट सापडली आहेत. त्यातील १४ गंभीर श्रेणीत आहेत तर ८ चिंता वाढविणारी आहेत असे समजते.