
पॅरिस : गूगलला झटका देत 500 मिलियन यूरो अर्थात 4,421 कोटी रुपयांचा दंड फ्रान्स सरकारने ठोठावला आहे. गूगलने एका पब्लिशर्ससोबत झालेल्या वादामध्ये कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपण ही कारवाई करत असल्याचे फ्रान्स सरकारने स्पष्ट केले आहे. तर फ्रान्स सरकारच्या या निर्णयावर गूगलने नाराजी व्यक्त केली आहे.
फ्रान्सने गूगलला कॉपीराईट कायद्याच्या उल्लंघनप्रकरणी ठोठावला तब्बल 4,421 कोटींचा दंड
एका पब्लिशर्सच्या बातम्यांचा वापर गूगलने आपल्या वेबसाईटवर केला होता. संबंधित पब्लिशर्सने त्यावर कॉपीराईटच्या कायद्यांचे उल्लंघन झाल्याची तक्रार करत फ्रान्सच्या कॉम्पिटिशन रेग्युलर कमिशनकडे धाव घेतली होती. या प्रकरणाची फ्रान्सच्या सरकारने गांभिर्याने दखल घेतली. फ्रान्सच्या अॅन्टिट्रस्ट वॉचडॉगने या वादात गूगलवर कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला. न्यूज पब्लिशर्सच्या माहितीचा गूगलने वापर केला, पण त्याचा मोबदला न दिल्याने त्याला 4,421 कोटी रुपयांचा दंड ठोठावला.
गूगल सरकारने ठोठावलेल्या दंडाची रक्कम कशापद्धतीने संबंधित कंपनीला देणार याची माहिती येत्या दोन महिन्यांच्या आत द्यावी, असाही आदेश देण्यात आला आहे. या दोन महिन्यांच्या कालावधीत गूगलने ही माहिती दिली नाही, तर पुढच्या काळासाठी प्रतिदिन जवळपास 10 लाख डॉलर्सची रक्कम दंड म्हणून भरावी लागेल, असाही आदेश देण्यात आला आहे.
दरम्यान गूगलने फ्रान्सच्या अॅन्टिट्रस्ट वॉचडॉगने ठोठावलेल्या दंडावर नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी आपण काही पब्लिशर्सशी चर्चा करत आहोत, पण त्याआधीच आपल्याला दंड ठोठावल्याचे गूगलने स्पष्ट केले आहे. फ्रान्सच्या अॅन्टिट्रस्ट एजन्सीने या आधी गूगलला तीन महिन्यांच्या आत पब्लिशर्सशी चर्चा करावी, असा आदेश दिला होता. त्याचे पालन न झाल्याचा ठपका ठेऊन आता गूगलला दंड ठोठावण्यात आला आहे.
