भारतातील पहिली करोना संक्रमित पुन्हा पोझिटिव्ह

देशात करोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ञ देत असतानाच भारतात सापडलेली पहिली करोना रुग्ण पुन्हा पोझिटिव्ह आली असल्याचे समजते. देशात करोनाची दुसरी लाट थोडी कमजोर पडत असतानाच ज्या बेफिकीरीने नागरिक करोना नियम ढाब्यावर बसवत आहेत ते पाहता तिसरी लाट लवकरच येऊ शकते असा इशारा केंद्राच्या आरोग्य विभागाकडून दिला गेला आहे.

केरळच्या त्रिसूर मधील डॉक्टर के. रीना यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात जी महिला प्रथम करोना संक्रमित आढळली होती, तिचा आरटीपीसीआर रिपोर्ट पुन्हा पोझिटिव्ह आला आहे. मात्र तिच्यामध्ये करोनाची लक्षणे दिसत नाहीत. शिक्षणासाठी दिल्लीला जाण्याच्या तयारीत असलेल्या या मुलीची करोना टेस्ट केली तेव्हा ती पोझिटिव्ह असल्याचे समोर आले. तिला होम आयसोलेशन मध्ये ठेवले गेले आहे.

३० जानेवारी २०२० मध्ये वुहानमध्ये मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेली ही विद्यार्थिनी सेमिनार सुट्टी साठी मायदेशी परतली होती. त्यावेळी तिची करोना टेस्ट पोझिटिव्ह आली होती आणि ती देशातील पहिली करोना संक्रमित बनली होती. तिच्यावर त्यावेळी त्रिसूर मेडिकल कॉलेज रुग्णालयात तीन आठवडे उपचार केले गेले होते आणि दोन वेळा तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर तिला डिस्चार्ज दिला गेला होता. विशेष म्हणजे अद्यापीही या मुलीने करोना लस घेतलेली नाही असेही समजते.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जगभर करोनाची तिसरी लाट वेगाने येत असल्याचा इशारा दिला आहे. युके मध्ये दररोज ३४ हजार, रशियामध्ये २५ हजार, बांग्ला देशात १३ तर इंडोनेशियात पुन्हा दररोज ४० हजार नवे करोना रुग्ण सापडत आहेत.