चालत्या एसयूव्हीच्या बॉनेटवर वधू बसली, पोलिसांनी चांगली वरात काढली

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यात खास प्रसंग म्हणून साजरा होणारा कार्यक्रम. त्यात नवीन काय करता येईल याचा शोध सातत्याने सुरु असतो. घोड्यावरून वरात हा अगदी नेहमीचा मामला. कुणी हेलीकॉप्टर, बलून, सिंहाच्या पाठीवरून असे प्रकार ही मांडवात येताना अवलंबतात. पुण्यातील एका वधूने अशीच खास वरात मांडवात जाण्यासाठी काढली खरी पण पोलिसांनी तिच्याविरुद्ध केस दाखल करून तिची निराळीच वरात काढली.

झाले असे की सासवड येथे होणारया विवाहास्थळी जाण्यासाठी एक नववधू चक्क एसयुव्हीच्या बॉनेटवर सजून बसली. रस्त्यावरून गाडी नेताना ड्रायव्हर अतिशय हळू चालवीत होता आणि अन्य एका व्यक्ती या वरातीचे व्हिडीओ शुटींग करत होती. याच रस्त्यावरून जात असलेल्या अन्य एका व्यक्तीनेही या वरातीचा व्हिडीओ काढून शेअर केला. पाहता पाहता तो व्हायरल झाला. पोलिसांच्या नजरेस हा व्हिडीओ येताच त्यांनी मोटर वाहन कायदा नियम भंग केल्याबद्दल वधू, कार चालक, कार मधील अन्य पाहुणे यांच्याविरोधात एक केस दाखल केळी.

विशेष म्हणजे या वऱ्हाडातील कुणीच मास्क लावलेला नव्हता. त्यामुळे करोना नियम तोडल्याबद्दल सुद्धा त्यांच्या विरोधात केस दाखल करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली आहे.