पुढील काही तास मुंबई, ठाणे, पालघरसह सात जिल्ह्यांना हवामान विभागाचा सावधानतेचा इशारा


मुंबई – पुन्हा एकदा पाऊस राज्यात सक्रिय झाला असून, राज्याच्या अनेक भागात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसाने मुंबई, पुण्यासह कोकण, मराठवाडा आणि विदर्भातही हजेरी लावली. मोठ्या विश्रांतीनंतर परतलेल्या पावसाने दमदार हजेरी लावली असून, पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहणार आहे. दरम्यान हवामान विभागाने पुढील काही तास मुंबई, ठाणे, पालघरसह सात जिल्ह्यांसाठी सावधानतेचा इशारा दिला आहे. सात जिल्ह्यात मध्यम ते अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त कले आहे.

दमदार पावसाने कोकणातील बहुतांश भागात दाणादाण उडवून दिली आहे. गेल्या २४ तासांत काही ठिकाणी २५० ते ३५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मुंबई परिसरासह रत्नागिरीत सोमवारी संध्याकाळपर्यंत जोरदार पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातील महाबळेश्वरलाही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत मराठवाडय़ातील परभणी येथे आजवरचा सर्वाधिक २३२ मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे या भागात जनजीवन विस्कळीत झाले असून, पाच हजार हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत.

पुढील काही दिवस सक्रिय झालेल्या झालेल्या पावसाचा जोर कायम राहणार असून, पुढील काही तासांत राज्यातील सात जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा ते तीव्र मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन तासांत तीव्र मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या क्षेत्राचा परिणाम म्हणून विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागांत पाऊस कोसळत आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील चार दिवस काही ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. विदर्भात तुरळक पावसाची शक्यता आहे.