स्थानिक बांधवांवरील अन्याय खपवून घेणार नाही – यशोमती ठाकूर


अमरावती : नांदगावपेठ एमआयडीसीतील सुदर्शन जीन्स या कंपनीने 48 कामगारांना नोकरीहून काढल्याच्या निर्णयाविरोधात कामगार बांधवांनी सुरु केलेले आमरण साखळी उपोषण पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मध्यस्थीने सोडविण्यात आले. या कामगारांना परत कामावर घेण्याचे व्यवस्थापनाने मान्य केले. स्थानिक बांधवांवरील अन्याय कदापिही खपवून घेणार नाही, असा इशाराही पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.

नांदगावपेठ एमआयडीसीतील सुदर्शन जीन्स प्रा. लि. प्रताप टेक्स्टाईल्स या कंपनीने 48 कामगार बांधवांना नोकरीवरून काढून टाकले होते. हे सर्व स्थानिक नागरिक असून, तीन वर्षांपासून कार्यरत आहेत. कामगार बांधवांनी पंकज शेंडे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या निर्णयाविरुद्ध उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची तातडीने दखल घेत पालकमंत्र्यांनी या आंदोलनाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहोचून कामगार बांधवांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी पालकमंत्र्यांनी कंपनीच्या अधिका-यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. या सर्व कामगार बांधवांना परत कामावर घ्यावे. कंपनीने कामगार कायद्याचे उल्लंघन करता कामा नये, असे आदेश त्यांनी कंपनी प्रशासनाला दिले.

पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या, नांदगावपेठ येथील औद्योगिक वसाहतीत नवनवे उद्योग उभे राहण्यासाठी 2010 पासून प्रयत्न होत आहेत. त्यामुळे अनेक उद्योग उभे राहिले. औद्योगिक विकास साधताना स्थानिक नागरिकांना नोक-यांमध्ये प्राधान्य मिळाले पाहिजे. सुदर्शन जीन्स कंपनीने कामगार बांधवांना क्षुल्लक कारणावरून काढून टाकले. तथापि, कोरोनाच्या या काळात कामगार बांधवाच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत.

कामगार कायद्याचे परिपूर्ण पालन व्हावे. उद्योगांचेही नुकसान होऊ नये यासाठी नियमानुसार काम झाले पाहिजे. मात्र, कुठलाही निर्णय घेताना कामगार बांधवांची बाजू समजून घेतली पाहिजे. त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. पालकमंत्र्यांच्या निर्देशानंतर या सर्वांना पुन्हा नोकरीत घेण्याचे व्यवस्थापनाने यावेळी मान्य केले. याबाबत तोडगा निघाल्याने भूमीपुत्रांना न्याय मिळाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.