कपडे तसेच अंर्तवस्त्रांवरुन स्त्रियांना ट्रोल करणाऱ्यांना हेमांगीने चांगलेच सुनावले


आपल्या दमदार अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत आणि टेलिव्हिजन विश्वात मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने चांगलीच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील हेमांगी चांगलीच सक्रिय असून सामाजिक मुद्दे मांडणे असो किंवा नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर देणे, यात ती कधीच मागे हटत नाही. नुकतेच एका व्हिडीओमुळे हेमांगीला ट्रोल करण्यात आल्यानंतर हेमांगीने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत या नेटकऱ्यांची बोलती बंद केली.

हेमांगीने स्त्रियांना त्यांच्या कपड्यांवरून तसेच अंर्तवस्त्रांवरुन ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच सुनावल्यानंतर फेसबुकवरदेखील एक पोस्ट शेअर करत हेमांगीने समाजात स्त्रियांवर कपड्यामुळे असणाऱ्या बंधनांच्या प्रश्नावर वाचा फोडली आहे. स्त्रियांना त्यांच्याच शारिरीक स्वातंत्र्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षावर हेमांगीने तिचे बेधडक मत मांडले आहे. अनेक मराठी कलाकारांनी हेमांगीच्या या पोस्टवर तिला पाठिंबा दिला आहे.

तिने ही पोस्ट बाई, बुब्स आणि ब्रा या शिर्षकाखाली शेअर केली. ती यात म्हणाली, ब्रा, ब्रेसियरचा (अंतर्वस्त्र) चार लोकांसमोर किंवा सोशल मीडियावर तरी येताना वापरण्याचा, न वापरण्याचा, अश्लीलतेचा, त्या स्त्रिच्या संस्कारांचा, बुद्धिमत्तेचा आणि तिच्या प्रतिमेचा, जो काही संबंध जोडला जातो, त्यासाठी स्त्रियांना त्यांच्याच शारीरिक स्वातंत्र्यासाठी अजून किती संघर्ष करायचाय हे लक्षात येते! आणि गंमत म्हणजे या चर्चा करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियाच जास्त अग्रेसर असतात. पुरुष निदान त्याची मजा घेऊन गप्प बसतात पण स्त्रिया स्वतः त्यातून जात असताना ही खालच्या स्तराला जाऊन चर्चा करून कुठले पदक मिळवतात कुणास ठाऊक!

हेमांगीने पुढे समाजात वावरताना मुलींना किंवा स्त्रीयांना त्यांच्या अंर्तवस्त्रामुळे येणाऱ्या बंधनावर तिचे मत मांडले आहे. हेमांगीच्या या बेधडक पोस्टवर दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी तिचे कौतुक केले आहे. विचार म्हणुन खतरनाक ऽऽऽऽ..लेखन म्हणुन वरचा दर्जा …साहित्य म्हणून कालातीत ..तू लढ हेमांगी, असे म्हणत प्रविण तरडेंनी त्यांच्या हटके स्टाइलने हेमांगीला पाठिंबा दिला आहे. तर अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शका रसिका आगाशेने देखील हेमांगीचे कौतुक केले आहे. लव्ह यू मुली, ब्रालेस असण्याचा आनंद असल्याचे रसिका म्हणाली.

तर अभिनेत्री वीणा जामकरने देखील हेमांगीच्या या पोस्टवर कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे. क्या बात हेमांगी..सॉलिड, लय भारी … वाचून सुद्धा हायसे वाटले गं … असे वीणा म्हणाली आहे. कलाकारांसोबतच अनेक नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी हेमांगीचे कौतुक करत तिने मांडलेल्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला आहे. हेमांगीने या आधीदेखील अनेक विषयांवर आपले मत मांडले आहे. हेमांगीने नुकतेच ‘सारेगम लिट्ल चॅम्पस्’ या कार्यक्रमातील पंचरत्नांवर होणाऱ्या टीकेवर परखड मत मांडले होते.