पोलंडचा हा हाडाचा शेतकरी सोशल मिडियावर चर्चेत

शेतकरी आणि तोही सोशल मिडियासारख्या माध्यमावर चर्चेत यावा ही तशी अनोखी घटना. त्यातून हा शेतकरी आहे पोलंडचा. हा देश काही शेतीसाठी प्रसिध्द नाही. भारतासारख्या कृषी प्रधान देशात शेती महत्वाची असते पण तरीही किंमत मिळतेय म्हटले की शेतकरी जमिनी विकून टाकताना आपण नेहमी ऐकतो. विशेषतः शहरीकरण होत असेल तर जमिनीला सोन्याचा भाव मिळतो आणि मग काळ्या आईची माया तोडून जमिनी विकल्या जातात. पोलंड मधील शेतकरी चर्चेत येण्याचे कारण त्याचे जमिनीवरील प्रेम आणि त्यासाठी कोट्यवधीची किंमत मिळत असतानाही ती न विकण्याची जिद्द.

पोलंडच्या लुबलीन मधली ही कथा. शहराच्या अतिशय पॉश भागात या शेतकऱ्याची जमीन आहे. आजूबाजूला बिल्डर्स लोकांनी गगनचुंबी इमारती बांधल्या आहेत. बिल्डर्सना ही जमीन सुद्धा हवी आहे. त्यासाठी मायकल मेस्लोवस्की नावाच्या या शेतकऱ्याला कोट्यवधी मोजण्याची त्यांची तयारी आहे. पण मायकेलचा त्यांना नकार आहे. ही जमीन त्याची वडिलोपार्जित जमीन आहे. सध्या या जमिनीत गहू असून मायकेल गहू कापणी करत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मायकेल म्हणतो मला शेती करता येते. ही जमीन मी विकली तर भविष्यात मला करायला काही काम राहणार नाही. मला काम केल्याशिवाय जगता येणार नाही. आणि ही माझी वडिलोपार्जित जमीन आहे. या जमिनीत मी वर्षभर वेगवेगळी पिके घेतो. मला ही जमीन विकायची नाही. मायकेलच्या या खुलाशावरच लोक फिदा झाले आहेत. त्याची कष्ट करून जगण्याची प्रवृत्ती त्यांना भावली आहे.