जुलैच्या पहिल्या १० दिवसात महाराष्ट्राची चिंता वाढवणारी कोरोनाबाधितांची आकडेवारी


मुंबई – कोरोनाची दुसरी लाट येऊन सहा महिने पूर्ण होत असतानाही महाराष्ट्रात अद्याप कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याचे चित्र आहे. पुन्हा एकदा प्रशासनाची चिंता राज्यातील आकडेवारीने वाढवली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये जुलै महिन्याच्या सुरुवातीला पहिल्या १० दिवसांत गेल्या १६ महिन्यातील सर्वाधिक रुग्णवाढ पहायला मिळाली आहे. फक्त गेल्या १० दिवसांत महाराष्ट्रात तब्बल ७९ हजार ५९५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर दुसरीकडे केरळमध्ये १ लाख २८ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. यासोबत महाराष्ट्र आणि केरळ पुन्हा एकदा देशातील एकूण रुग्णसंख्येत सर्वाधिक वाटा असणारी राज्ये झाली आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्येत महाराष्ट्र आणि केरळचा ५३ टक्के वाटा आहे.

विशेष म्हणजे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दैनंदिन बाधितांची संख्या २५ हजारांच्या पुढे गेलेल्या दिल्लीत परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दिल्लीत १ ते १० जुलै दरम्यान फक्त ८१७ नवे रुग्ण आढळले आहेत. अनेक महत्वाच्या शहरांमध्ये रुग्णसंख्या दोन आकडी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सहा महिने पूर्ण होऊनदेखील महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाबाधितांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात का वाढत आहे, याचे कोणतेही योग्य उत्तर मिळू शकलेले नाही. याबाबत अनेक अंदाज व्यक्त केले जात आहे. दरम्यान दोन्ही राज्यातील सार्वजनिक आरोग्य अधिकारी पारदर्शकता आणि योग्य माहिती देण्यात आल्यामुळे आमची संख्या जास्त दिसत असल्याचे म्हटले आहे.

पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट कहर करत असल्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. कोरोनाच्या लाटेने शिखर गाठले असताना दोन्ही राज्यांमध्ये रुग्ण आढळले होते. रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होण्याचे संकेत मिळत असल्याची माहिती मुंबईतील एका डॉक्टरांनी ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर दिली आहे. महाराष्ट्रातील डॉक्टरांनी कोल्हापूरमधील परिस्थिती चिंताजनक होत असल्याचे सांगितले असून पुन्हा एकदा दुसऱ्या लाटेने आक्रमक रुप धारण केल्याची शक्यता वर्तवली आहे. कोल्हापुरात दैनंदिन रुग्णसंख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. कोल्हापुरात सर्वाधिक लसीकरण झाले असून दैनंदिन बाधितांच्या संख्येतही कोल्हापूरच पहिल्या क्रमांकावर असल्याचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले आहे. कोरोनाची लागण होणाऱ्यांमध्ये लसीकरण न झालेल्या तरुणांची संख्या जास्त असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या वेळी कोरोना शिखर गाठत आहे. बाधितांची संख्या वाढत असल्यामुळे कोरोना व्हायरस अद्यापही फैलावत असल्याची भीती साथरोगतज्ञ डॉ. गिरीधर बाबू यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात एकूण आठ जिल्ह्यांमधील परिस्थिती सध्या चिंताजनक असल्याचे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले आहे.