वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण


चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव येथील पिंटू मोतीलाल राऊत (वय ३१वर्ष) व गुंजवीना पिंटू राऊत (वय २७ वर्ष) ह्या पतीपत्नीचा व तळोधी (खुर्द) येथील अरविंद मारोती तिजारे (वय ४० वर्ष) ह्यांचा वीज पडून मृत्यू झाला होता. सदर मृत व्यक्तिंच्या वारसांना प्रत्येकी ४ लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते ब्रम्हपुरी येथील शासकीय विश्रामगृहात करण्यात आले.

राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत-पुनर्वसन विभागामार्फत वीज पडून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना ४ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करण्यात येते. ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव येथील रहिवासी असलेले पिंटू मोतीलाल राऊत व गुंजविना पिंटू राऊत हे १८ सप्टेंबर २०२०ला ब्रम्हपुरी येथून पारडगाव येथे दुचाकीने जात असतांना त्यांच्या धावत्या दुचाकीवर वीज पडून त्यांचा मृत्यु झाला होता. तर तळोधी खुर्द येथील अरविंद तिजारे यांचा गोगाव शेतशिवारात वीज पडून मृत्यू झाला होता.

सदर मृतक व्यक्तींचे वारस कुसुम मोतीलाल राऊत व पार्षद पिंटु राऊत रा.पारडगाव यांना एकुण ८ लाख रु. व वर्षा अरविंद तिजारे रा. तळोधी(खुर्द) यांना ४ लाख रुपयांचे धनादेश पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात आले.

यावेळी खेमराज तिडके, प्रभाकर सेलोकर, जि.प. सदस्या स्मिता पारधी, ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, तहसीलदार विजय पवार, नगरसेवक डॉ. नितीन उराडे, माजी सभापती नेताजी मेश्राम, माजी सरपंच जयपाल पारधी, मुन्ना रामटेके यांची उपस्थिती होती.