थरारक कथा एका विमान अपहरणकर्त्याची


ही कथा आहे २४ नोव्हेंबर १९७१ या दिवशीची. या दिवशी दुपारी पोर्टलंड, ओरेगॉन कडून सीअॅटलकडे निघालेले ‘नॉर्थवेस्ट ओरियेंट’चे बोईंग ७२७-१०० हे विमान उड्डाणाच्या तयारीत होते. आपले नाव डॅन कूपर असल्याचे सांगून एका इसमाने या विमानाचे तिकीट खरेदी केले. त्याचे खरे नाव डॅन कूपर नसल्याचे निष्पन्न नंतरच्या तपासकार्यात झाले असले, तरी आजही त्या इसमाला डी बी कूपर याच नावाने ओळखले जाते. उंची सूट परिधान केलेला आणि हाती चामड्याची बॅग असणारा हा इसम आपले तिकीट हाती घेऊन सरळ आपल्या विमानाच्या दिशेने निघाला. विमानामध्ये प्रवेश केल्यानंतर त्याने विमानामधली सर्वात मागची सीट बसण्यासाठी निवडली. आपल्या हातातली बॅग मात्र इतर प्रवाश्यांच्या प्रमाणे ओव्हरहेड कंपार्टमेंटमध्ये न ठेवता, त्याने स्वतःच्या जवळच ठेवली. काही वेळातच सर्व प्रक्रिया पार पाडून विमानाने आकाशात उड्डाण केले आणि एअर होस्टेसेसची, प्रवाश्यांना चहापान करविण्याची लगबग सुरु झाली. इतक्यात कूपरच्या सीट जवळून एक एअर होस्टेस जात असताना कूपरने तिला थांबविले आणि तिच्या हातामध्ये एक चिठ्ठी दिली.

अनेकदा प्रवासी एअर होस्टेसेसना आपले व्हिजिटिंग कार्ड किंवा फोन नंबर देत असतात. ही चिठ्ठीदेखील तशीच आहे असे समजून एअर होस्टेसने या चिठ्ठीकडे एक नजर टाकली मात्र, तिच्या तोंडचे पाणी पळाले. चिठ्ठीमध्ये कूपरने, आपण या विमानाचे अपहरण करीत असून, आपल्याकडे बॉंब असल्याचे म्हटले होते. विमान अपहरणाबद्दल एअर होस्टेसच्या मनामध्ये असलेली शंका, कूपरने आपल्या हातातील बॅग उघडून त्यातील खरोखरचा बॉंब दाखविल्यानंतर त्वरित दूर झाली. एअर होस्टेसचे लक्ष आपण संपूर्णपणे आकृष्ट करून घेतले आहे याची खात्री होताच कूपरने तिला आपल्या अटी सांगितल्या. विमान सर्वात जवळच्या विमानतळावर उतरवून त्यामध्ये रात्रभर प्रवासाला पुरेल इतके इंधन भरून घेतले जावे, आपल्याला दोन लाख डॉलर्स दिले जावेत, आणि आपल्यासाठी पॅराशूट उपलब्ध केले जावे, अश्या आपल्या अटी असल्याचे कूपरने एअर होस्टेसला सांगितले. सद्य परिस्थितीने हवालदिल झालेल्या एअर होस्टेसने त्वरित कॉकपिट गाठत वैमानिकांच्या कानावर सर्व प्रकार घातला. वैमानिकांनीही वेळ वाया न घालवता त्वरित सीअॅटल एअर ट्रॅफिक कंट्रोलला सर्व हकीकत कथन केली.

विमानाचे अपहरण झाल्याचे समजताच एअर ट्रॅफिक कंट्रोलने सुरक्षा यंत्रणा सक्रीय करीत कूपरच्या सर्व अटी मान्य करीत असल्याचे कळविले. पोलीस खात्यापासून एफबीआय पर्यंत सर्व यंत्रणा कामाला लागली. कूपरच्या मागणीप्रमाणे दोन लाख डॉलर्स मूल्याच्या नोटा तयार ठेवण्यात आल्या. या नोटा पुढे ‘ट्रेस’ करता याव्यात यासाठी या नोटांचे नंबर एफबीआयने आधीच नोंदवून घेतले. तेवढ्यात अमेरिकन वायुसेनेची दोन लढाऊ विमाने देखील या बोईंग वर नजर ठेवण्यासाठी आकाशात झेपावली. इकडे कूपरच्या अटीनुसार विमानाने इंधन भरून घेतले, आणि कूपरसाठी दोन लाख डॉलर्स आणि पॅराशूट विमानाच्या जवळ नेऊन ठेवण्यात आले. कूपरच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्या, की तो विमानामधून खाली उतरेल आणि मग त्याला लगेच अटक करता येईल असा अंदाज सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बांधला होता.

मात्र कूपरच्या मनामध्ये काही तरी वेगळेच शिजत होते. आपल्या मागणीप्रमाणे सर्व वस्तू त्याला मिळाल्यानंतरही कूपरने विमानातून बाहेर पडण्यास नकार देत वैमानिकांना पुनश्च उड्डाण करण्यास सांगितले. प्रवाश्यांच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता वैमानिकांनी कूपरचे म्हणणे मान्य करीत पुन्हा उड्डाण केल्यानंतर विमान मेक्सिकोच्या दिशेने घेऊन जाण्यास कूपरने सांगितले. विमानाने उड्डाण करताच वायुसेनेच्या लढाऊ विमानांनीही पाठोपाठ उड्डाण केले. कूपरने वैमानिकांना, विमान कर्मचाऱ्यांना आणि प्रवाश्यांना देखील आपल्या जागेवरून अजिबात न हलण्याची सूचना दिली. एव्हाना रात्र झाली असल्यामुळे विमानामध्ये काळोख दाटला होता. विमानातील सर्वच जण जीव मुठीत घेऊन पुढे काय घडणार याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करीत होते. अचानक कॉकपिटमध्ये बसलेल्या वैमानिकांना, विमानातील हवेच्या दबावामध्ये झपाट्याने बदल होत असल्याची जाणीव झाली. ही धोक्याची सूचना होती. अखेरीस सहवैमानिकाने कॉकपिटमधून बाहेर पडून नक्की काय घडले आहे हे पाहण्याचे ठरविले आणि त्याप्रमाणे तो कॉकपिटमधून बाहेर आला, तेव्हा विमानाचे प्रवेशद्वार उघडे असल्याचे त्याला दिसले. त्याने वेगाने विमानानाचे प्रवेशद्वार बंद केल्याने मोठी दुर्घटना टळली.

त्यानंतर त्वरित सहवैमानिकाने आणि इतर कर्मचाऱ्यांनी कूपरचा शोध घेण्यासाठी संपूर्ण विमान धुंडाळले, मात्र कूपर, पॅराशूट आणि त्याची पैश्यांनी भरलेली बॅग सर्वच गायब होते. त्यावरून विमानाचा दरवाजा उघडून कूपरने पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून उडी मारली असल्याचे निष्पन्न झाले. पण यामध्ये सर्वात विलक्षण गोष्ट अशी, की कूपरला विमानातून बाहेर पडताना प्रवासी, विमान कर्मचारी, इतकेच काय, तर या विमानाच्या सोबत उडत असलेल्या लढाऊ विमानांच्या वैमानिकांनी देखील पहिले नव्हते. त्यामुळे कूपर विमानाच्या बाहेर नेमका कधी पडला आणि पुढे त्याचे काय झाले, हे आजतागायत न उकललेले रहस्य होऊन बसले आहे. आज देखील कूपरच्या चेहऱ्याचे वर्णन करणारे एक स्केच तेवढे अस्तित्वात असून, हा मनुष्य कुठून आला, कुठे गेला, त्याचे खरे नाव काय हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहेत.

Leave a Comment