मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी या आयुर्वेदिक औषधी सर्वोत्तम


आजच्या काळामध्ये शारीरिक तणावाच्या मानाने मानसिक तणाव अधिक वाढलेला दिसत आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच जीवनामध्ये या ना त्या कारणाने मानसिक तणाव आहेच. हा मानसिक तणाव जर हाताबाहेर जाऊ लागला तर त्याचे निष्पन्न एखाद्या मानसिक रोगामध्ये देखील होऊ शकते. मनासिक आजार उद्भवल्यास त्याच्या जोडीने इतर शारीरिक आजार उद्भवण्याचा धोकाही वाढू शकतो, म्हणूनच सध्याच्या काळामध्ये मानसिक आणि न्युरोलॉजिकल आजारांचे वाढते प्रमाण आढळून येत आहे. मेंदूचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आणि मानसिक आजार दूर ठेवण्यासाठी काही औषधींचा वापर आयुर्वेदाने सुचविलेला आहे.

आयुर्वेदाच्या अनुसार मानसिक तणावामुळे शरीरातील कफ, वात आणि पित्त या त्रिदोषांचेही संतुलन बिघडत आणि त्यामुळे निरनिराळे आजार उद्भवू लागतात. त्यामुळे हे दोष संतुलित ठेवण्याच्या उद्देशाने आणि त्याचबरोबर मानसिक तणाव कमी करीत मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्याच्या उद्देशाने आयुर्वेदामध्ये काही औषधींचा वापर सुचविण्यात आला आहे. या सर्व औषधी सहज उपलब्ध असून, यांचा वापर करण्याच्या पद्धतीही अतिशय सोप्या आहेत. मेंदूच्या उत्तम आरोग्यासाठी, मेंदू सजग ठेवण्यासाठी, थकवा नाहीसा करण्यासाठी, निद्रानाश नाहीसा करण्यासाठी आणि स्मरणशक्ती सुधारण्यासाठी शंखपुष्पी अतिशय उत्तम समजली जाते. ही औषधी शीतलता प्रदान करणारी असून, एक दुधासोबत एक चमचा शंखपुष्पी, दिवसातून दोन वेळा घेतल्याने उत्तम गुण येतो.

ब्राह्मी हे देखील उत्तम ब्रेन टॉनिक असून, याची पावडर किंवा पेस्ट दुधाबरोबर सेवन करता येते. ब्राह्मीचा ताजा पाला ठेचून त्याचा रस काढून दिवसातून दोन चमचे हा रस सेवन करावा. सर्व वयाच्या लोकांसाठी ब्राह्मी उपयुक्त असून, विशेषतः विद्यार्थ्यांसाठी ब्राह्मी अतिशय लाभकारी आहे. ब्राह्मीचे चूर्ण शतावरी, आणि अश्वगंधा चूर्णांच्या सोबत घेतल्याने वारंवार उद्भवणारा पित्ताचा विकार शमतो. मेंदूला शांत करणारी ही औषधी आहे. पित्तामुळे डोकेदुखी होत असल्यासही ही औषधी उपयुक्त आहे. शतावरी ही औषधी शरीर आणि मेंदूला ताकद देणारी आहे. तसेच ही औषधी बुद्धिवर्धक आहे. शतावरी चूर्ण दररोज एका लहान चमचा भरून दुधाबरोबर किंवा मधाबरोबर घेतल्याने मानसिक तणाव, थकवा कमी होण्यास मदत होते. तसेच दृष्टीदोष सुधारण्यासाठी देखील ही औषधी उपयुक्त आहे.

अश्वगंधा ही औषधी मानसिक तणाव कमी करणारी, आणि मेंदूला उत्तम आरोग्य देणारी औषधी म्हणून फार प्राचीन काळापासून उपयोगात आणली जात आहे. अश्वगंधाची मुळे औषधी म्हणून वापरली जात असून, शारीरिक अशक्तपणा, वंध्यत्व, आणि तत्सम विकारांवर ही औषधी उपयुक्त आहे. मात्र या औषधीचे सेवन इतर औषधींच्या सोबत करणे टाळावे. तसेच या औषधीच्या अतिसेवनाने उलट्या, जुलाब, पोट दुखणे, पोट बिघडणे अश्या तक्रारी उद्भवू शकतात. गर्भवती महिलांनी या औषधीचे सेवन करणे टाळावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment