निसर्गाने यांना दिल्या असामान्य शक्ती


आपल्यापैकी प्रत्येकाला निसर्गाने अनेक क्षमता प्रदान केल्या आहेत. मात्र काही व्यक्तींना निसर्गाने अश्या शक्ती दिल्या, की वरकरणी या व्यक्ती सर्वसामान्य भासत असल्या, तरी त्याच्या अंगी असलेल्या काही असामान्य शक्तींमुळे या व्यक्तींनी अशक्यप्राय वाटणारी कामेही सहज करून दाखविली. या व्यक्तींच्या अंगी असलेल्या शक्ती ‘सुपरह्युमन’ म्हणायला हव्या. अश्याच काही व्यक्तींबद्दल जाणून घेऊ या. लिऊ थो लिन या मलेशियन मनुष्याचा लौकिक ‘मॅग्नेटिक मॅन’ असा आहे. लिनच्या शरीराला कोणतीही लोखंडी वस्तू लोहचुंबकाला चिकटावी तशी जाऊन चिकटत असल्याने त्यांना हा लौकिक प्राप्त झाला आहे. दोन किलोंपासून छत्तीस किलो वजन असलेल्या कुठल्याही लोखंडी वस्तू लिन यांच्या शरीराला सहज चिकटत असतात. आपल्याला मिळालेली अद्भुत शक्ती उपयोगामध्ये आणून लिन यांनी चारचाकी मोटारकारही खेचली आहे.

‘मिस्टर ईट ऑल’ या नावाने ओळखले जाणारे मिखेल लोलितो फ्रांसचे रहिवासी असून, न खाता येणाऱ्या वस्तू खाऊन पचविण्याची असामान्य शक्ती निसर्गाने त्यांना दिली होती. वास्तविक मिखेल यांना ‘पिका’ नामक व्याधी असून, त्यामुळे सहसा न खाता येणारे पदार्थ मिखेल खात असत आणि पचवतही असत. मिखेल खात असलेल्या वस्तूंमध्ये धातूने बनलेल्या वस्तू, काचा, रबरी वस्तू इत्यादींचा समावेश असे. इतकेच नव्हे, तर मिखेल यांनी सायकल, कार, टीव्ही, इतकेच नव्हे तर संपूर्ण सेस्ना विमानाचे भाग सुटे करून ते खाल्ले आणि पचविले देखील! सेस्ना विमान संपूर्णपणे खाऊन फस्त करण्यासाठी मिखेल यांना दोन वर्षे लागली होती. १९५९ ते १९९७ या काळामध्ये मिखेल यांनी तब्बल नऊ टन वजन भरेल इतक्या धातूच्या वस्तू खाऊन फस्त केल्या होत्या.

मानवी गणकयंत्र, म्हणजेच ‘ह्युमन कॅल्क्युलेटर’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या शकुंतला देवी अतिशय अवघड गणिते संगणकापेक्षा अधिक वेगाने सोडवीत असत. त्यामुळेच १९८२ साली ‘ह्युमन कॉम्प्यूटर’ म्हणून शकुंतला देवींचे नाव गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंदले गेले होते. कर्नाटकातील बेंगळूरू शहराच्या निवासी असणाऱ्या शकुंतला देवी यांनी गणित, आणि खगोलशास्त्रावर अनेक पुस्तके लिहिली. सामान्य मनुष्याला असते, त्याहून वीस पट तीक्ष्ण दृष्टी असणारी व्हेरोनिका सायडर ही जर्मन महिला आहे. ती उभी असेल तिथून १.६ किलोमीटर अंतरावर म्हणजेच एक मैल अंतरावर कोण उभे आहे हे व्हेरोनिकाला स्पष्ट दिसू शकते, तर ‘द आईसमॅन’ म्हणून ओळखला जाणारा विम हॉफ रक्त गोठविणारी थंडी सहज सहन करू शकतो. विम याला गळयाइतक्या बर्फामध्ये पुरले तरी त्याच्या शरीराचे ‘कोर टेम्परेचर’ मात्र सामान्य राहते, हा निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवा. २००७ साली विमने जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एवरेस्टवर ७,२०० मीटर पर्यंतची चढाई केवळ शॉर्ट्स आणि शूज घालून केली होती.

Leave a Comment