सिझेरियन सेक्शनने प्रसूती झालेल्या महिलांनी अशी घ्यावी काळजी


आई होणे हा कोणत्याही महिलेच्या आयुष्यातला खूप मोठा, आनंद देऊन जाणारा प्रसंग असतो. मात्र गर्भवती असतानाचा काळ अनेक महिलांसाठी कठीण ठरू शकतो. या दिवसांमध्ये महिलांच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे बदल घडून येत असतात. त्यायोगे अंगावर सूज येणे, रक्तदाब कमी-जास्त होणे, इत्यादी समस्या उद्भवू लागतात. त्यानंतर प्रसूतीची वेळ येते तेव्हा प्रसूती सामान्य होणार की सिझेरियन सेक्शन करून प्रसूती करावी लागणार हे ठरविण्यासाठी देखील अनेक बाबी विचारात घेतल्या जातात. आजच्या काळामध्ये झपाट्याने बदलत चाललेल्या खानपानाच्या सवयी आणि जीवनशैलीमुळे अनेकदा गर्भवती महिलेचे शरीर सामान्य प्रसवासाठी तयार नसते. अश्या वेळी सिझेरियन सेक्शन करून प्रसूती करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. सिझेरियन सेक्शन, किंवा सी-सेक्शन द्वारे प्रसूती झाली असली, तर महिलांना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते.

सी-सेक्शनद्वारे प्रसूती झालेल्या महिलांनी किमान पाच आठवडे वजनदार वस्तू उचलणे टाळावे. या दिवसांमध्ये सतत वजन उचलले गेल्यास त्याचा दबाव सी-सेक्शन केल्या गेलेल्या ठिकाणी घातलेल्या टाक्यांवर पडू शकतो. त्या ठिकाणी सूज येण्याचा धोकाही अश्यावेळी उद्भवतो. त्यामुळे या दिवसांमध्ये शक्य तितकी विश्रांती घेणे आवश्यक आहे. पुरेशी विश्रांती न घेतल्यास पुढे कंबरदुखी, किंवा अचानक उद्भवलेला रक्तस्राव अश्या समस्या येऊ शकतात. सी-सेक्शन झाल्यानंतर महिलांनी आपल्या खानपानाकडे विशेष लक्ष देणे जरुरी आहे. या दिवसांमध्ये बद्धकोष्ठ आणि गॅसेसचे प्रमाण वाढत असल्याने आहारामध्ये पचनास हलके आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश जास्त असावा. सी-सेक्शन झाल्यानंतर त्वरित तळलेले पदार्थ खाण्याचा मोह टाळणे उत्तम.

सी-सेक्शन झाल्यानंतर पोटावर आणि पर्यायाने गर्भाशयावर जोर पडेल अश्या गोष्टी टाळाव्यात. याच कारणास्तव जास्त चढ असलेल्या रस्त्यावर चालणे, किंवा सतत जिन्यांची चढ उतार टाळण्याचा सल्ला डॉक्टर्स देत असतात. सी-सेक्शनच्या वेळी घातलेल्या टाक्यांची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. हे टाके ओले राहिल्यास त्यामध्ये संक्रमण होण्याचा धोका असतो. त्यामुळे दरवेळी ड्रेसिंग बदलताना ज्या ठिकाणी टाके आहेत ती जागा व्यवस्थित स्वच्छ करून संपूर्ण कोरडी करून मगच ड्रेसिंग केले जावे. तसेच या काळामध्ये पोट चोळून घेणे, शेक घेणे ही टाळावे. टाक्याच्या ठिकाणी असह्य वेदना होत असल्यास, संक्रमण झाले असल्यास, किंवा रक्तस्राव होत असल्यास त्वरित डॉक्टर्सचा सल्ला घ्यावा. डॉक्टरने दिलेली औषधे वेळेवर आणि न चुकता घ्यावी. नवजात अर्भकाला स्तनपान करण्याच्या दृष्टीने देखील ही औषधे धोकादायक नसल्याने या औषधांचे सेवन वेळेवर आणि नियमितपणे केले जाणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment