येथे चक्क अस्वलालाच दिली जन्मठेप !


एखाद्या गुन्ह्याबद्दल कैद्यांना जन्ठेपेची शिक्षा झाल्याचे आपण ऐकत असतो, मात्र जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी एखाद्या जनावराला कारागृहामध्ये ठेवण्याची घटना कझाकस्तान मधील तुरुंगामध्ये घडली आहे. या तुरुंगामध्ये एक मादी अस्वल जन्ठेपेची शिक्षा भोगत आहे. कझाकस्तान येथील कोस्टनी कारागृहामध्ये एकूण ७३० कैदी आहेत. यांपैकी बहुतेक कैद्यांना पंचवीस वर्षापर्यंत शिक्षा सुनाविली गेली आहे. मात्र या मादी अस्वलाला जन्मठेपेची शिक्षा दिली गेली असून, तिने मरेपर्यंत याच कारागृहात राहायचे आहे. अश्या प्रकराची शिक्षा दिली गेलेली ही मादी या कारागृहातली एकमेव कैदी आहे.

या अस्वलाचे नाव केट्या असून, ही छत्तीस वर्षांची आहे. ही मादी अस्वल पूर्वी सर्कशीत काम करीत असे. पण काही काळानंतर सर्कशीतून तिची रवानगी एका कॅम्पिंग साईटवर करण्यात आली. इथे तिला एका पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवले गेले होते. कॅम्पिंग साईटवर येणारे लोक या अस्वलाला लोक काही ना काही खाऊ घालीत असत. एक दिवस अकरा वर्षांच्या एका मुलाने केट्याला काही खाऊ घालण्याच्या उद्देशाने तिच्या पिंजऱ्याजवळ हात नेला असता, केट्याने त्या लहानग्याच्या हाताचा चावा घेतला. या घटनेच्या काही दिवसानंतर केट्याने व्हिक्टर नामक एका व्यक्तीवरही जीवघेणा हल्ला केला होता.

अश्या घटना वारंवार घडू लागल्यानंतर केट्याला प्राणी संग्रहालयामध्ये पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. पण तिच्याबद्दल ऐकून असलेल्या प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी केट्याला तिथे ठेऊन घेण्यास साफ नकार दिला. त्यामुळे सरते शेवटी केट्याची रवानगी कारागृहामध्ये करण्यात आली. केट्या गेली पंधरा वर्षे या कारागृहामध्ये बंदिस्त आहे. या कारागृहामध्ये असलेली एकमेव जन्मठेपेची कैदी आणि ती देखील अस्वल असल्याने, केट्या या कारागृहाची खासियत बनली आहे.

Leave a Comment