नवी दिल्ली – संपूर्ण जगाला कोरोनाने आपल्या विळख्यात घेतल्यामुळे कोरोनाशी लढा देण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहे. कोरोना लसीकरणावर अनेक देशांनी जोर दिला आहे. त्यात अनेक देशांनी कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिसताच नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. कोरोना संपला नाही, त्याचा वेगही कमी झालेला नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले आहे. त्यामुळे यापुढे काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कोरोना गेला या भ्रमात राहू नका; WHO च्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांचा इशारा
कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मागच्या दोन आठवड्यात आफ्रिकेतील मृत्यूदर ३०-४० टक्क्यांनी वाढला आहे. मागच्या २४ तासात ५ लाख नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९,३०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही काय कोरोना कमी होण्याची लक्षणे नसल्याचे सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले. डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक घातक आहे. या व्हायरसची लागण झालेला व्यक्ती ८ जणांना संक्रमित करतो. तेच प्रमाण कोरोनाच्या इतर व्हायरसमध्ये ३ एवढे आहे. त्यामुळे डेल्टा व्हायरस किती घातक आहे? याचा अंदाज येतो, असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाचा नवा डेल्टा व्हेरिएंट पसरण्याची चार प्रमुख कारणे
- कोरोनाचा नवा डेल्टा व्हेरिएंट व्हायरस वेगाने पसरत आहे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित करण्याचा वेग अधिक आहे.
- कोरोनाबाधितांच्या संख्येत लॉकडाउन आणि नियम शिथिल केल्यामुळे वाढ झाली आहे.
- कोरोनाचा बाजारात, कार्यक्रमात लोकांची गर्दी वाढल्यामुळे वेगाने प्रसार होत आहे.
- कोरोना लसीकरणाचा वेग मंदावल्याने बाधितांची संख्या वाढत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे घरातच असणाऱ्या लोकांना मानसिक थकवा जाणवत आहे. त्यामुळे ते सक्तीने बाहेर पडत समाजामध्ये मिसळत आहेत. पण संपर्क वाढल्यामुळे कोरोनाचा वेगाने प्रसार होत आहे. त्यात अनेक देशांनी कोरोनावरील निर्बंध शिथिल केले आहेत. तसेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे बंधनकारण नसल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर लसीकरणाचा वेग मंदावला आहे. अनेक देशात लसींचा तुटवडा जाणवत आहे. तसेच आरोग्य सुविधांचा अभाव असल्यामुळे मृत्यूदर वाढला आहे.
कोरोनावर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस प्रभावशाली असल्याचे देखील सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितले. या लसीचा प्रभाव चांगला दिसत आहे. कोव्हॅक्सिनच्या ३ टप्प्यातील अहवालाचा अभ्यास सुरु आहे. कोव्हॅक्सिनला ऑगस्टच्या मध्यापर्यंत जागतिक परवानगी मिळेल, असेही त्यांनी सांगितले.