मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये प्रीतम मुंडेंना डावलल्यामुळे जिल्हा सरचिटणीसह 24 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे


बीड : मोदी सरकारने नुकत्याच केलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचे पडसाद आता बीडमध्ये उमटू लागले आहेत. भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना डावलल्याने मुंडे समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे. पदाधिकारी आणि भाजप कार्यकर्त्यांचे राजीनामे सत्रच सुरूच आहे. 25 जणांनी आज दिवसभरात राजीनामे दिले आहेत. विशेष म्हणजे राजीनामा देणाऱ्यांमध्ये बीड जिल्ह्यातील सात तालुका अध्यक्षांचा समावेश आहे.

मंत्रिपदावरून खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांना डावलल्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भाजप कार्यकर्ते नाराजी सत्र सुरू होताच, जिल्ह्यातील 7 तालुका अध्यक्षांनी राजीनामे दिले आहेत. सर्व तालुकाध्यक्षांनी भाजपचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्याकडे आपले राजीनामे सादर केले.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे यांनी काल राजीनामा दिल्यानंतर आज जिल्ह्यातील जवळपास 24 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. आज शिरूर कासार तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य, सविता रामदास बडे यांनी जिल्हा परिषद सदस्यपदाचा तर प्रकाश खेडकर यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे.