कडकनाथ देणार करोनाशी लढण्यासाठी इम्युनिटी

करोना होऊन गेलेल्या व्यक्तींना अथवा करोना न झालेल्यांना त्याची लागण होऊ नये यासाठी कडकनाथ कोंबडीचे सेवन फार उपयुक्त असून कडकनाथ इम्युनिटी बुस्टर ठरेल असा दावा मध्य प्रदेशातील झाबुआ कडकनाथ रिसर्च सेंटर व कृषी विज्ञान केंद्राकडून केला गेला आहे. त्यासंदर्भात एक पत्र इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) कडे पाठविले गेले आहे.

करोना झालेल्यांना किंवा करोना पासून बचाव होण्यासाठी व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती मजबूत हवी यावर आता एकमत झाले आहे. करोनातून बाहेर पडलेल्यांना खाण्यापिण्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला तज्ञ देत आहेत. कडकनाथ रोगप्रतिकार शक्ती क्षमतेत वाढ करण्यास उपयुक्त असून करोना काळात डायट मध्ये त्याचा समावेश करावा असे या पत्रात म्हटले गेले आहे. कडकनाथ कोंबडीचे मांस, अंडी अत्यंत पोषक आणि प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहेत. त्यात जीवनसत्वे, झिंक आहे, फॅट कमी आहे आणि कोलेस्टेरॉल नाही.

कडकनाथ रिसर्च सेंट्रर ने पाठविलेल्या पत्रासोबत नॅशनल मीट रिसर्च सेंटर व मेडिकल जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेले अहवाल जोडले गेले आहेत. करोना लढाई साठी इम्युनिटी हे सर्वात प्रबळ हत्यार असून ज्यांची इम्युनिटी चांगली ते करोनाला सहज मात देऊ शकतात असे दिसून आले आहे. इम्युनिटी कमी असलेल्यांना हाय प्रोटीन डाएट घेण्याचा सल्ला दिला जात आहे अशावेळी कडकनाथ सेवन एक चांगला पर्याय ठरू शकतो असा या सेंटरचा दावा आहे.