मुंबईत आज पुरेशा लस साठ्याअभावी लसीकरण बंद


मुंबई : देशासह राज्यावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. अशातच तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असून या पार्श्वभूमीवर देशभरात लसीकरण मोहीमेने वेग धरला आहे. पण, लसीकरण मोहिमेत पुरेशा लसींच्या साठ्याअभावी अडथळे येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही पुरेशा साठ्याअभावी लसीकरण मोहीमेमध्ये अनेक अडथळे येत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील शासकीय आणि महापालिका केंद्रांवरील लसीकरण आज दिनांक 9 जुलै, 2021 रोजी बंद ठेवण्यात येणार आहे.

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर आज (शुक्रवार) दिनांक 9 जुलै 2021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

ज्या प्रमाणात लसींचा साठा प्राप्त होईल, त्यानुसार योग्य तो निर्णय घेऊन मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. त्याचप्रमाणे लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. यासंदर्भातील योग्य ती माहिती मुंबईकरांपर्यंत पोहोचवली जाईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव देशासह राज्यात कायम असून काही प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. हे जरी खरे असले तरी कोरोनापासून बचावासाठी सध्या एकमेव मार्ग म्हणजे लसीकरण, असे तज्ज्ञांच्या वतीनेही वारंवार सांगितले जात आहे. देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. अशातच मुंबईतही 16 जूनपासून लसीकरणाला सुरुवात झाली होती. आतापर्यंत मुंबईकरांनी लसीकरणाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या आठवड्यात केंद्र सरकारकडून लसींचा पुरेसा साठा उपलब्ध न झाल्यामुळे मुंबईतील लसीकरण मोहीम काही प्रमाणात मंदावल्याचे पाहायला मिळत आहे.

मुंबईतील कोरोना परिस्थिती आटोक्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच गेल्या 24 तासांत मुंबईत 540 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांत 628 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 7714 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मुंबई शहराचा दर दुपटीचा कालावधी हा 858 दिवसांवर जाऊन पोहोचला आहे. अशातच मुंबईत आतापर्यंत 701195 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.