धक्कादायक; कसोटी अजिंक्यपद सामन्यादरम्यान भारतीय क्रिकेटपटूला झाली शिवीगाळ


नवी दिल्ली: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात गेल्या महिन्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना इंग्लंडमधील साउदम्प्टन येथे पार पडला. न्यूझीलंडने या सामन्यात ८ बळी राखत विजय मिळवत विजेतेपद मिळवले. अंतिम सामन्यात पावसाने महत्त्वाची भूमिका पार पाडली. पावसामुळे पहिल्या आणि तिसऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही. तर अन्य दिवशी देखील पावसाचा व्यत्यय आला होता. हा सामना सुरू असताना भारताच्या एका खेळाडूला शिवीगाळ करण्यात आल्याचे समोर आले आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिक समालोचन करत होता. या लढतीत सुनील गावस्कर यांच्या सोबत समालोचन करणारा कार्तिक हा एकमेव भारतीय होता. या सामन्यात त्याला समालोचनासाठी नाही, तर अन्य एका कारणामुळे शिवीगाळ करण्यात आली होती.

सामना सुरू असताना पाऊस पडल्यामुळे आणि लवकर न उठल्याने मला शिवी दिली जात होती, असे कार्तिक म्हणाला, साउदम्प्टन येथे वेदरमॅनची जबाबदारी मला देण्यात आली होती. तो हवामानाशी संबंधित अपडेट देत असे. यावरून त्याला शिवी खावी लागली. कारण लोकांना उत्सुकता होती की तेथे काय सुरू आहे. पाऊस पडतो आहे की नाही.

कार्तिक २२ यार्न्स पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाला, वेदरमॅन ही दुधारी तलवार आहे. पहिल्या दिवशी खुप कौतुक झाले. दुसऱ्या दिवशी देखील आनंद झाला. तिसऱ्या दिवशी लोकांनी शिव्या देण्यास सुरूवात केली. मला झोपायचे होते. हवामानाचे अपडेट देण्यासाठी मी रोज सकाळी ६ वाजता उठू शकत नाही. पण या गोष्टीला क्रिकेट चाहते सोशल मीडियावर फार गंभीरपणे घेत होते. त्यांनी मला शिव्या देण्यास सुरुवात केली. उठ, तु काय करतोस अशा वाक्यांनी सुरुवात झाली आणि काही शब्द आहेत, जे मी सांगू शकत नाही. मला यासाठी शिव्या दिल्या जात होत्या कारण पाऊस पडत होता.

मी हवामानाचे अपडेट देण्यासाठी लवकर उठू शकलो नाही. मला एक दोन नव्हे तर हजारो शिव्या दिल्या, असे तो म्हणाला. गेल्या काही दिवसात कार्तिक पुन्हा एकदा चर्चेत आला होता जेव्हा त्याने इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील वनडे सामन्यात बॅट ही शेजाऱ्याच्या बायको सारखी, असते असे वक्तव्य केले होते.