कसा होतो झिका व्हायरसचा प्रादुर्भाव? जाणून घ्या लक्षणे आणि बचावाची माहिती


नवी दिल्ली – एकीकडे देशावर कोरोनाचे ओढावलेले संकट नियंत्रणात अद्यापही आलेला नसतानाच आता केरळमध्ये झिका व्हायरस आढळून आला आहे. एका गर्भवती महिलेचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. ज्या रुग्णालयात ही महिला उपचार घेत होती, तेथील काही नर्स आणि डॉक्टरांचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवले असता ते देखील पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले जात आहे. हा झिका व्हायरस म्हणजे काय आणि त्याचा कसा प्रादुर्भाव होतो? त्याची लक्षणे आणि बचावाची माहिती आज आम्ही तुम्हाला देत आहोत.

झिकाचा संसर्ग हा डासांमुळे होणारा व्हायरल प्रादुर्भाव आहे. हा प्रादुर्भाव डासांच्या एडीज प्रजातीद्वारे पसरतो. डेंग्यू आणि चिकनगुनिया व्हायरस देखील एडीज डासांमुळे पसरतात. झिका व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीचे रक्त पिल्याने डासांना व्हायरसची लागण होते. त्यानंतर ते डास इतर लोकांमध्ये व्हायरस पसरवितात. झिका व्हायरस गर्भवती महिलांवर सर्वाधिक प्रभाव करतो. यामुळे झिका व्हायरसची लागण झालेल्या महिलांनी जन्म दिलेल्या बाळांमध्ये मायक्रोसेफॅली होऊ शकते. मायक्रोसेफली हा एक दुर्मिळ जन्म दोष आहे ज्यामध्ये बाळाचे डोके अपेक्षेपेक्षा लहान असते, जे मेंदूच्या विकासाच्या समस्यांशी संबंधित असू शकते.

एडीस डासांच्या चाव्याव्दारे झिका व्हायरसचा संसर्ग प्रामुख्याने पसरतो. हे डास सहसा दिवसा चावतात. एखाद्या व्यक्तीस डास चावल्यामुळे संसर्ग झाल्यास झिका व्हायरस त्यांच्या रक्तात काही दिवस तर काही लोकांमध्ये जास्त काळ राहू शकतो. या संक्रमित व्यक्तींना चावलेला डास इतर लोकांमध्ये व्हायरसचा संसर्ग पसरवू शकतो. झिका व्हायरसचा संसर्ग एखाद्या संक्रमित व्यक्तीशी लैंगिक संबंध किंवा दूषित रक्त स्त्रोतांसारख्या इतर माध्यमांद्वारे होऊ शकतो.

ताप, डोकेदुखी, स्नायू आणि सांधे दुखी, शारीरिक अशक्तपणा, डोळे लाल होणे, उलटी, ही झिका व्हायरसची लक्षणे आहेत. झिका व्हायरसचा प्रादुर्भाव होत असलेल्या प्रदेशातून परत आल्यावर आपल्याला लक्षणे दिसल्यास, वैद्यकीय मदत घेणे महत्वाचे आहे. झिका व्हायरसच्या संसर्गाची लक्षणे अनेक इतर कारणांमुळे देखील दिसू शकतात. डॉक्टर आपली लक्षणे आणि प्रवासाच्या तारखांवर आधारित झिका व्हायरस प्रादुर्भावाचे प्रारंभिक निदान करु शकतात.

झिका व्हायरसच्या संसर्गासाठी कोणतेही विशिष्ट उपचार नाहीत. उदाहरणार्थ, डॉक्टर ताप आणि डोकेदुखीसाठी औषधाची शिफारस करु शकतात. म्हणजेच आपल्याला असलेल्या लक्षणांवर उपचार केला जातो. डास अंधार असलेल्या ठिकाणी, ओलसर जागी किंवा साचलेल्या पाण्यात असू शकतात. त्यामुळे डास चावण्यापासून स्वताचा बचाव करावा. यासाठी, बग स्प्रेचा वापर करावा, मच्छरदाणीचा देखील उपयोग करावा.

तसेच झिका व्हायरसची लक्षणे दिसल्यास त्वरित डाक्टरांशी संपर्क साधावा व योग्य उपचार घ्यावा. हा व्हायरस कोरोनाप्रमाणे जीवघेणा नसल्यामुळे पुरेशी काळजी घेतल्यास त्यावर मात करता येऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यानुसार, डासांच्या चावण्यापासून स्वत:चा बचाव करणे आणि लागण झाल्यास पुरेसा आराम करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही