भाजपच्या संस्कृतीत ‘मी’पणा मान्यच नाही – पंकजा मुंडे


मुंबई – भाजपला टीम देवेंद्र, टीम नरेंद्र मान्य नाही. भाजपच्या संस्कृतीला ‘मी’पणा अमान्य असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चेवर पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. त्यांनी यावेळी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले. तसेच यावेळी त्यांनी प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चा असणे योग्य असल्याचेही सांगितले.

टीम देवेंद्रमध्ये कोण आणि टीम नरेंद्रमध्ये कोण हे मला माहिती नाही. पण हे भाजपला देखील मान्य नाही. भाजपला देश प्रथम, नंतर राष्ट्र आणि नंतर मी. भाजपमध्ये ‘मी’पणा मान्यच नाही. आपण, आम्ही असे म्हणणे मान्य असल्यामुळे अशी कोणती टीम असणे पक्षाला मान्य असेल असे मला वाटत नसल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले. भाजपच्या संस्कृतीचा सन्मान करणारी मी कार्यकर्ता आहे. मी कोणती मंत्री नाही, मी कोणत्या पदावर नाही. मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पक्षनिष्ठा माझ्या वडिलांनी मला संस्कारात दिली असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

नेहमी आमच्या नावाची चर्चा असते. प्रीतम मुंडे यांच्या नावाचीही चर्चा सुरु होती. त्या दिल्लीत दाखल झाल्याची चुकीची माहितीही देण्यात आली. मला तर काही कार्यकर्त्यांनी दिल्लीसाठी निघालो असल्याच्या तिकीटाचे स्क्रीनशॉट पाठवले होते. गैरसमज होऊ नये म्हणून मी मुंबईत असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यावरुन मी नाराज असल्याचा कयास लावण्यात आला. मी नाराज असण्याचे कारण नाही. मुंडे साहेबांचे आमच्यावर संस्कार आहेत. कोणाला संधी मिळाली तर आनंद वाटणे कर्तव्य असल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

भारती पवार, कपिल पाटील यांच्याशी मी बोलले होते. आदल्या दिवशी त्यांना मेसेज आल्यामुळे ते दिल्लीत होते आणि प्रीतम मुंडेंना मेसेज नसल्यामुळे त्या मुंबईत होत्या. काही महान लोकांनी पंकजा मुंडेंनी ट्वीट केले म्हणून प्रीतम मुंडेंचे मंत्रीपद गेल्याचे म्हटले असून हे हास्यास्पद असल्याचेही यावेळी त्या म्हणाल्या.

भागवत कराड यांचा रात्री १२.३० वाजता मला फोन आला होता. मुख्यालयातून फोन आला होता आणि दिल्लीत मी दाखल झालो असल्याची माहिती त्यांनी दिली होती, असं पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले. लोकांशी माझे नाते आहे, संबंध नाही. नाते कधीच तुटत नाही पण संबंध कडू गोड होत असतात. लोकांचे प्रेम असल्यामुळे ते व्यक्त होत असतात असे यावेळी त्या म्हणाल्या.